दोन फुलें - हीं कालाचीं दोन फुले दों ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
हीं कालाचीं दोन फुले दों हातीं
दोघांवर माझी प्रीती
क्षण यावरती क्षण त्यावरती पाही
द्दष्टी मम नाचत राही
हुंगितों क्षणैक तयातें
चुंबुनि घडिघडी यातें
मी वदतों. रे देवा नित्य असूं दे
गुंगत मज यांच्या छंदें
परि काल वदे “नाहीं, वेडया ! नाहीं
चंचलता मानवता ही
दे स्वकरींचे एक फूल मज आतां
दुसर्यावर तूं कर सत्ता.
हें बाल्य खेळतें येथें
तारुण्य हासवी मातें
वद काळा ! मी यांत कुणाला सोडूं.
शब्दही नको तो काढूं !
मधु हास्यानें परिमल पूरित झाले
प्रेमानें सिंचित केलें
सुखदु:खांच्या मंद तरल भावांनींहीं
हें बाल्य डुले सुखदायी
नाहीं तें तुजला देत
रंगेन अखंड तयांत
तं जा जा जा, फूल दुजें तें घेई
पर्वा मज त्याची नाहीं
परि थांब जरा नको त्यासही नेऊं
दे मला घडीभर पाहूं
हें थबथबलें दिव्य प्रीतिरसानें
स्वर्गाचें यांतच ठाणें
मी देऊं कसा वद याला !
मज्जीवित सर्वखाला
मज राहूं दे काला कौमार्यांत
डोलत या दोन फुलांत
Last Updated : November 11, 2016
TOP