मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
दीपशिखे, फडफडतेसी । कां म...

दीपशिखा - दीपशिखे, फडफडतेसी । कां म...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


दीपशिखे, फडफडतेसी । कां म्हणुनि वद गे मजसी ?
तेजाचे पसरुनि पंख । विगतभाग होऊनि देख
धडा करुनि जीवाचाही । कुठें उडूं बघसी बाई ?
हर्ष, शोक, उन्माद गडे । उदासता कीं तुला जडे ? १

स्वैराची केवळ पुतळी । तूं तर बाला अनलकळी;
आवरणें देहाभंवतीं । हीं तुझिया, तुज आडविती;
म्हणुनिच कीं मारून उडी । तोडुनिया त्यांची वेडी
स्वैराला भेटायाला । जीव तुझा उत्सुक झाला ? २

[ही मधुरा मारुतलहरी । मंद मंद संचार करी;
रम्य तिचा करुनी वारू । विश्वभरी विचरूं, विहरूं;
जें न पाहिलें कधीं कुणीं । दिव्य दावुं तें प्रगटवुनी
इच्छा कीं असल्या कांहीं । नाचविती तुजला बाई !] ३

किंवा तुजभंवतीं जमल्या । अद्दश्यरूपें दीपकव्या,
कीं त्यांची फुलली बाग । त्वन्नयनीं दिसते सांग;
प्रेमभरें चुंबायाला । कडकडुनी भेटायाला,
तोडुनि हे हृदबंध गडे । धांवतेस कीं तयांकडे ? ४

किंवा त्या ताराज्योती । नील नभीं लुकलुकताती,
सखी तयांची तूं म्हणुनी । त्याच बाहती तुला कुणी,
ती त्यांची बोली कळली । खूण पटे ह्रदयामधली,
जीवाचा ओढा लागे । झेप घालिसी त्यांमागें ?

तेजाचे डोंगर वरतीं । कासारहि सरिता असती,
विश्वजननिचें दूध गडे । तेथ वर्षतें चोंहिकडे;
नक्षत्रें बाळें गगनीं । दूधच तें त्यांच्या वदनीं;
सुधा सुधा प्राशायाला । तीच - लागली भूक तुला ! ६

भूक लागली - माझाही । तळमतो आत्मा बाई;
पाजुनिया निजविल त्याला । माय अशी न दिसे मजला.
ती आई तुजला बाई । दिसली ग शंका नाहीं
देहपात्र हें झुगारुनी । म्हणुनिच तूं उडसी गगनीं ७

थांब थांब गे निमिषभरी । थांब येवढी कृपा करीं;
नि:श्वसितावरती बसुनि । दिव्य तुझ्या तेजामधुनी
जड मूढा येऊं देई । याहि, तुझ्यासंगें ताई !
परम धाम हृदयांचें तें । दाखव, गे दाखव मातें, ८

आई ती हृदयीं भारते । जल नयनीं भरुनी येतें.
बहु दिवसां ताटातूट । दे करुनी आतां भेट;
गाय वासरूं एक करीं । पुण्य पुण्य घे शिरावरी;
ने, ने, ने उचली बाई । चल झरझर घेउनि जाई. ९

आईच्या मांडीवरतीं । गोड अहाहा शब्द क्रिती !
प्रेमसुधाकल्लोलच ते । चल जाऊं राहूं तेथें,
तूं भगिनी मी तव भाऊ । दोघेही एकच होऊं;
आईच्या हृदयांत गडे । ऐक्य तुझें माझेंहि घडे १०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP