कुणि नाहीं ग, कुणि नाहीं आम्हांला पाहत बाई,
शांति दाटली चोंहिकडे, या ग, आतां पुढें पुढें,
लाजतलाजत, हळूंच हांसत,
खेळ गडे, खेळूं कांहीं, कोणीही पाहत नाहीं. १
सुंदरतेला नटवून, कोमलतेला खुणवून,
प्रेमाच्या वसतीकरितां जगदंतर फुलवूं आतां,
दिव्य सुरांनीं गीतें गाउनि
विश्वाला निजवायाला वार्याचा बनवूं झोला, २
फेकुनि द्या इकडेतिकडे थोडेसे दंवबिंदु गडे,
या निर्मल अवकाशांत प्रेमाचें पेरूं शेत,
दिव्यमोहिनी - सवें गुंगुनी
विश्वाला वत्सलतेनें प्रेमाचें गाऊं गाणें, ३
सरितांच्या लहरींवरतीं नाचूं या निर्भयचित्तीं
अर्धोन्मीलित फुलवोनी लपूं चला कलिकांत कुणी
कविहृदयांत गरके घेत
जाउनिया खेळूं आतां हीं गाणीं गातां गातां ४
एखादी तरुणी रमणी रमणाला आलिंगोनी,
लज्जामूढा भीरूच ती शंकित जर झाली चित्तीं,
तिच्याच नयनीं कुणी बिंबुन
धीट तिला बनचा बाई भुलवा ग, रमणालाही. ५
सुप्वप्नांनी गुंगवुनी पुण्यात्मे हसवा कोणी
आशा ज्या त्यांच्या चित्तीं, त्याच रचा स्वप्नांवरतीं
दयितचिंतनीं, विरहभावनीं
दिवसां ही झुरली बाला, भेटूं द्या स्वपती हिजला ६
अनेक असले खेळ करूं प्रेमाशा विश्वांत भरूं,
सोडुनिया अपुले श्वास खेळवुं नाचवुं उल्हास
प्रभातकाळीं नामनिराळीं
होऊनिया आपण राहूं लोकांच्या मौजा पाहूं. ७