मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
या शुभ्र विरल अभ्रांचें ।...

मोहिनी - या शुभ्र विरल अभ्रांचें ।...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


या शुभ्र विरल अभ्रांचें । शशिभंवतीं नर्तन चाले,
गंभीर धवळली रजनी । वेभान पवनही डोले;
तंद्रींतच अर्धीमुर्धी । लुकलुकते ताराराणी,
ये झुंजुमुंजु तेजानें । पूर्वेवर पिवळें पाणी;
निस्पंद मंद घटिका ती । अंधुकता धुंद भरीत,
ब्रम्हांडमंदिरीं गाई । सौभाग्यसुभरा संगीत.

निद्रिस्त नील वनमाला । निद्रिस्त सरोवर खालीं,
वर मूक मोहनें जैसीं । शशिकिरणें विरघळलेलीं;
इवलाअ अधर हलवून । जल मंद सोडितें श्वास;
इवलाच वेल लववून। ये नीज पुन्हां पवनास.
निश्चिंत शांति - देवीचा । किंचितसा अंचल हाले;
रोमांच कपोलीं भरती । कुंजांत कोकिला बोले.

घननील ल्कतावलयांत । हिमधवल शिलातलभागीं
चमकून मोहिनी झाली । जणुं कुंजगुंजनें जागी,
सौंदर्यभरीं भरलेलें । तारुण्य चढे रंगास,
अलवार कोंवळें अंग । जशि काय फुलांची मूस.
धरि आम्रमंजरी कानीं । हातांत जुईची वेणी,
कंठांत मालतीमाला । माधवीच भासे बाला.

मदनाची मंगलमाया । नटनाच करी हृदयांत;
स्फुरतात कल्पनातीत । रणकार सुखाचे त्यांत.
किति होत नाच नयनांचा । किति रंग मुखावर आले;
तें चित्र चोर चित्ताला । कितिदां तरि चुकवुनि गेलें.
उत्कंठा धीर धरीना । लागला दुखाया ऊर;
तारुण्यतरल बालेच्या । चित्तांत भरे हुरहूर.

पायांत रुप्याचा तोडा । ये थबकत थोडा थोडा
युवराज विजयसिंहाचा । झाडींतुनि पिवळा घोडा.
शिरपेंच शिरावर साजे । पाठीवर लटके ढाल,
रूदार झगा जरतार । अंगावर हिरवी शाल’
उतरून विलासी वीर । चुबुनि ती मोहनमाला
जणुं रम्य हृदय रमणीचें । हळुवार धरी हृदयाला.
उतरुन वारुवरतून । सरदार शिपाई आले;
हळुवार हृदय रमणीचें । हृदयाशीं संगत झालें.

(या पद्यपंक्ति एखाद्या खंडकाव्याच्या आरंभींच्या असाव्यात. कथानायिकेवरून नांव द्यावें, तर तें या पद्यपंक्तींत आढळत नाहीं. वबदाव्या ओळींतील ‘मोहिनी’ हें तर त्या कथानायिकेचें नांव नसेल ना ? - संपादक)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP