मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
आद्य ऋषींनीं जी केली । ते...

धर्मवीर - आद्य ऋषींनीं जी केली । ते...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


आद्य ऋषींनीं जी केली । तेजाची पूजा पहिली,
ती करणें ज्यां ज्यां लोकां । ते सारे सावध ऐका !
गर्जूं द्या हिंदिस्तान । ऐकुनि हें माझें गान,
धर्मवीर हिंदिस्तान, । देवाचा कलिजा प्राण,
बाळ तयाचे जे कोणी, । धर्मवीर हिंदिस्तानीं,
ते सारे सावध ऐका, । सत्यधर्म कथितों लोकां -
ज्या तेजामध्यें भिनले । आद्य ऋषी जाउनि सगळे,
तेंच तेज हृदयीं भिनतां, । आद्य ऋषी बघतां बघतां -
अवतरुनी तुमच्या हृदयीं । स्फूर्तिमंत्र गातिल कांहीं !
जडतेचें लागुनि भूत । सृष्टि करी हळहळ येथ.
उणीव तेजावीच जगीं । भासतसे जागोजागीं,
क्षुद्र तुम्हीं बनला का रे ! मायेनें भुललां सारे !
तेजाला अवमानुनियां । अंधारीं मरतां वाया,
मरणाचें काढुनि मरण । घ्या मिळवा जीवंतपण !
वाट करा तेजाला रे, । फोडुनि हीं कारागारें
प्रकाश द्या सृष्टीला तो, । जो तुम्हांवरतीं येतो !
धर्माचारांची माती । कां धरुनी बसलां हातीं ?
मातीवर चढतें कीट, । सत्य धरा ध्यानीं नीट,
सत्य सदा निर्भेळच तें, । आज उद्यां येथें तेथें,
रूढींचें चढलें कीट । धर्मावर, परजा नीट !
सत्याची समशेर धरा, । असत्य सारें पार चिरा !
आद्यऋषींचा सद्धर्म । हेंच मात्र त्याचें वर्म -
सत्य प्रस्थापित व्हावें, । देहमनें जीवेंभावें,
जडतेची काढा कीट, । तेजाची उजळा वाट.
धर्मपताका घ्या हातीं, । उदार व्हा देहावरतीं !
अहंकार जिरला नाहीं, । मोह पुरा विरला नाहीं -
धर्माच्या वाफा नुसत्या । दवडितसां भलत्यासलत्या !
तोंडावर बसली माशी । शक्ति न ती उडवायासी !
विषयांचा नयनीं धूर, । धर्म मात्र तुमचा थोर !
दिडकीला सतरा पापें, । धर्म धर्म म्हणणें सोपें !
ब्रम्हाचर्य तुमचें थोर, । चवदावे वर्षीं पोर !
देहाचे बनलां दास; । मायेचा बसला फांस,
स्वार्यानें वेडे झालां, । धर्माचा मुडदा केला !
धर्म नव्हे संध्यास्नान, । धर्म नव्हे आसनध्यान;
तत्त्वज्ञानाचे बोल, । तें धर्मावरचें फोल !
अंतरंगिं तुमच्या वसतो, । आचरणीं तुमच्या दिसतो,
धर्म खरा तुमचा तोच, । बाकींचे शाब्दिक नाच !
वर्णाया सुंदर फार । धर्म नव्हे नाजुक नार.
जीवाचें द्यावें मोल, । धर्म तेधवां समजेल.
तोंबरि या वाफा सोडा, । ‘धर्म’ म्हणा, छाती झोडा -
अध:पात टळणें नाहीं, । धर्म खरा कळणें नाहीं !
रूढि अशी कोणी दावा, । बदल’ जिला नाहीं ठावा.
नामरूप बदलायाचें । चंचलता जगतीं नाचे !
ही वरची पोपटपंची, । अजुनि किती घोकायाची ?
आंत चला उघडा डोळे, । मोहाचे सोडा चाळे;
परात्पराची कांस धरा, । तेजाची समशेर करा !
अंधकार तोडा मोडा; । धर्म खरा पदरीं जोडा.
बाधक ते तोडुनि बंध, । सत्याचा मिळवा छंद
भिऊं नका कलिकाळाला; । धर्मवीर ! जय जय बोला !
अग्नीनें जळणें नाहीं, । शस्त्रानें तुटणें नाहीं;
पाण्यानें जळणें नाहीं, । वार्‍यानें उडणें नाहीं.
दिक्कालापरते तुम्ही, । विश्वाचे अवघ्या स्वामी !
धर्म तुम्हांसाठीं बनला, । धर्म तुम्ही तुमचा केला.
सत्याला नांदायाला, । देव जगीं स्थापायाला;
तेज जनीं पसरायाला, । धर्म तुम्ही तमचा केला.
देवाला विसरुनि कां रे, । या पोकळ धर्माचारें
सत्याचा अवमान करा ? । अध:पात हा खराखुरा !
सत्य खरें स्थिरलें जेथें, । तेज खरें मुरलें जेथें
देव खरा विलसे जेथें, । धर्म खरा अमुचा तेथें,
सत्यासाठीं नित्य नवे । धर्मनियम आम्हांस हवे,
तेजाचीं आम्हीं बाळें, । सत्यरूप आम्ही सगळे.
धर्मवीर हिंदिस्तान, । देवाचा कलिजा प्राण !
बाळ तयाचे जे कोणी । धर्मवीर हिंदिस्तानीं,
स्वार्थाला देउनि लाय, । तेजाचा धरुनी हात,
खरे विरागी धीरवर, । गांभीर्याचे महीधर,
दिव्य चिंतनीं रमणार, । स्वयंपणें विश्वाकार,
विश्वकुटुंबी विश्वधनी, । तेच खरे हिंदिस्तानीं,
धर्मवीर हिंदिस्तान, । देवाचा कलिजा प्राण !
सत्य बोल हे करा उठा - । धर्मवीर ! अद्वैत लृटा !
शुद्ध सत्य हृदयांत धरा, । तेजाचा उपदेश करा !
मायामय कारागारा, । तोडा मोडा पार करा !
आचारांनी प्रौढी नसे, । सत्य ठसावें करा असें.
धर्मपताका घ्या हातीं,  । व्हा केवळ तेजोमूर्ती.
व्हा सगळ्या विश्चां नेते, । धर्मंतत्त्व अमुचें हें तें,
सत्यधर्म निरहंकार, । सर्वांचें समता सार ;
सत्यधर्म जगतीं प्रेम. । चोंहिंकडे आत्माराम.
स्वार्थाचा नुरला लेश, । देहाचा गळला पाश,
मरणाला आलें मरण, । सत्यधर्म जीवंतपण !
सत्यधर्म कळणें नाहीं, । जोंवर ही जडता राही;
धर्माचें तोंवर सोंग, । जा मिरवा नुसतें ढोंग !
मेलेल्या सजवा रूढी, । गात बसा त्यांची प्रौढी !
शूद्रांचे सोसा शाप. । देशावर लादा पाप !
विधवांना रडतचि ठेवा । धर्माच्या मिरवा नांवा !
कोणि असो कसली जात, । आम्ही तर पसरूं हात !
देशाचाहि बंध नसे, । विश्व सर्व अमुचेंच असे.
चोहिंकडे आत्माराम । सर्वांवर अमुचें प्रेम,
खाणारे आम्ही मोतीं । राजहंस भूमीवरतीं,
आद्य ऋषींनीं सांगितलें, । संतांनीं अमुच्या कथिलें.
धर्मतत्त्व हें खरें खरें । आम्हांला कळलें सारें !
धर्मवीर भूमीवरतीं, । धर्मतत्त्व अमुच्या हातीं;
देवाचे आम्ही प्राण, । आम्हांला भिवविल कोण ?
काळाचे आम्ही काळ, । काळदिशा अमुचा खेळ !
तेजानें  भरलीं अंगें ! नेउं जगा तेजामागें !
हिमगिरिचा काढा कांटा, । एकिकडे सागर लोटा;
वाट करा आम्हांला रे, । कां मरतां व्यर्थचि सारे ?
तेजाचे आम्ही दास, । सत्याची धरिली कांस;
देवांला फिरवूं मागें । दाखवितां कसलीं सोंगें,
देहाची परवा नाहिं, । नांवाच्ख नाहीं;
धर्मवीर भूमीवर्तीं । त्या अमुची असली गीती ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP