श्रमलें दमलें वणवण फिरूनी गगनीं रविकरजाल;
शिणल्या सुंदर सांध्यदेविचें हो घर्मांकित भाल,
शिणले मारुत, खिन्न पयोधर दुर्धर साहुनि ताप
शून्य गिरिदरी, जर्जर निर्झर गळती आपोआप
उदासवाणें एकच गाणें शून्य मनें वनराई
घोळित राही, लागुनि तंद्री शीण भरे तद्देहीं,
शिणलें कोणी संसाराचा बाहुनि माथां भार,
अनंत चिंताकाहूरांनीं भरे कुणाचें ऊर
गायन गातां शिणली माता, शिणलें तान्हें बाळ,
शिणला पालख; मंद हालुनी घालविताई काळ.
शिणली काया, शिणली माया, शिणले लोकाचार,
सौख्यहि शिणलें, दु:खहि शिणलें, शिणले तत्त्वविचार,
काळवंडल्या वातावरणीं ये करुणामय वाणी,
शीण पावली प्रीतिदेवता ब्रम्हांडाची राणी.
जगन्मोहिनी काव्यविणेचा मंद पडे रणकार,
ग्रहगोलांवर, गंधर्वाचा एक जुळेना सूर,
पक्वपणाची पिवळी छाया सुंदरतेवर रांगे,
ब्रम्हांडाचीं शीण पावलीं, श्रमलीं दमलीं अंगें,
ये, ये, ये जगदेकमाउली ! ये रजनी लवलाही,
सृष्टिदेवता नातरि बुडते भीषणतेच्या डोहीं.
तव अधरावर जन्म पावती नंदनवनिंचे वात,
नवजीवन ये उसळूनि तुझा वरती फिरता हात
तुझिया स्पर्शे मृदु पल्लविता शांत लता ही घेई;
दिव्यदर्दनीं तुझ्याच जननी, फुलते सुंदरताहि.
आद्यदेवते रजनी, ये ये निजले श्रीभगवान,
ब्रम्हांडाचा भार माउली तुजविण वाहिल कोण ?
प्रीतिदेविला नवसंजीवन कोण पुन्हा देईल ?
ग्रहगोलांना निज कक्षांतुनि कोण पुन्हां नेईल ?
येथे रजनी, ये फिरफिरुनी, येशील न तूं जेव्हां
प्रलयकाळ या ब्रम्हांडाचा सत्वर होइल तेव्हां !