ओंवाळणि घाली भाई - सुखशयनीं मी निजलें होतें ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
सुखशयनीं मी निजलें होतें बाई !
स्वप्नें मज पडलीं कांहीं !
त्या स्वप्नांच्या मनोमयी लीलांहीं;
मन माझें गुंगुनि जाई.
त्या प्रणयाच्या स्वर्गसुखाच्या लीला
अंतरल्या मज दुबळीला !
निद्रा ती उडुनि गेली - गे !
रजनी ही प्रगटे मेली !
भयचिंता जडली भालीं -
मन आतां हें विषण्ण वदतें बाई
‘गेलें ते गेलें पाहीं !’
तों आकाशीं शशांक ये उदयाला
पुवेंला हांसविण्याला;
मधुकौमुदिचें क्षौम धवल नेसोनी
नटली ती होती रजनी;
मी प्रणयाचीं रेखित चित्रें तेव्हां
सौधावर बसलें. देवा !-
तों मेध भराभर आले - गे
चपलेनें कंपित केले !
हस्तांतुनि चित्र गळालें !
त्यामागें हें हृदय पळाळें बाई !
‘गेलें तें गेलें पाहीं !’
मज स्वर्गीचें सुमन लाधलें रानीं,
मी आणीलें उचलोनी;
मधुगंधानें त्याच्या तन्मय झालें.
तद्रूपीं रंगुनि गेलें !
तें स्वर्गीचें सौख्यच माझें झालें.
नंदनवन गेहीं आलें;
तों भूमि दुभंग जहाली - गे !
सुम माझें घेउनि गेली !
लोटिलें मला पाताळीं !
हा ! निर्लज्जा दैवा तव करणी ही,
‘गेलें तें लाधत नाहीं !’
तों एकाकीं दिव्य तेज मज दिसलें.
न कळे मज कोठुन आलें;
‘चल भगिनी ये’ ऐसे शब्द निघाले,
कोणीसें मज उद्धरिलें !
मज आशा ज्याची नव्हती - गे !
तें साक्षात माझ्या पुढतीं !
मी वेडी झालें पुरती !
तें माझ्या हया कंठीं बांधुन देई !
ओवाळणि घाली भाई !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP