माझें दिव्य - बाहय जगांतुनि दिव्य रसाचा...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
बाहय जगांतुनि दिव्य रसाचा पूरच हा लोटला,
हर्षविल अंत:सृष्टी मला.
अमृतरसाचा पाट नभांतुनि धावत हा पातला,
लोळवी परमनंदीं मला.
निर्झर की हा शांतिसुखाचा मम हृदयीं झरतसें.
पुढें कीं नंदन हें मज दिसे.
हा प्रणयविकासी उज्ज्वलतेवी खनी.
तारकापुंज कीं भरला माझ्या मनीं.
स्वर्गदीप्तिसह सखि कविता ये मग हृदयीं धांवुनी
करी मज गुंग सदा गायनीं.
सृष्टि हांसवी मला फुलांनी, तारांनीं नभ तसें,
सदाचें मंगल मज देतसें.
जिकडे तिकडे दिव्य सांठलें. रत झालें गायनीं;
पहा याजनीं मनींकीं वनीं.
त्यासह जी क्रीडा प्रेमच माझें खरें,
ही क्रीडा म्हणजे जीवित माझें बरें,
या दिव्यासह सखि कवितेशीं जिणें वेचिलें जरी
खरी मज माझी मुक्ती तरी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP