बाल विहग - सांज खुले सोन्याहुनि पिवळ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


बाल - विहग
सांज खुले सोन्याहुनि पिवळें हें पडलें ऊन;
चोहिंकडे लसलशीत बहरल्या हिरवाळी छान.
पांधरली जरतार जांभळी वनमाला शाल;
सांध्यतेज गिरिशिखरीं बिखरी संमोहनजाल.
त्या तेजाचा प्राण चिमुकला संध्येचा दूत
बाल विहगा आनंद मूर्तिमान झुलतो गगनांत.
क्षणभर येथें क्षणभर तेथें, भिंगोरी साची
अवकाशीं जशि काय फिरविली फिरकी जादूची !
खेळडू कविबाळ करूनि जणुं भावांची होडी
मूर्तरूप देऊनी तिला या वार्‍यावर सोडी.
गिरीशिखराचें गोड - फूल हें सांध्या तरंगांनीं
झुलुनि त्यांतला पराग कीं हा भरभरतो गगनीं !

अष्टदिशांचा गोफ सभोंतीं हा भिरिभिरि पाहे;
मंद झुले वनमाल, बाहता शांत झरा राहे.
समाधिस्थ जणुं काय जहलें हा गिरे, हें रान
हा आनंदोद्रेक नाचरा गगनीं पाहून !
सुंदरतेचा जलसा असला पाहुनिया धाला
कालहि वाटे विस्मित चित्तें स्तब्ध उभा ठेला

सृष्टिदेविच्या सगुणा बाळा स्वर्गाच्या तान्हया
नांवहि रे तव ठाउक नाहीं मज गोजिरवाण्या !
निजदेहाचा करुनि असा हा सुंदर आंदोल
आत्मरंगिं रंगल्या मनाला झुलविसि कीं बोल ?
किंवा कोणी दिव्य देवता जरि न दिसे मज ती
लीलेनें तुज हालविते का घेउनिया हातीं ?
सुंदरतेच्या सुमनावरचें दंव चुंबुनि घ्यावें,
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हांत हिंडावें,
प्रीतिसारिका गीत तियेचें ऐकावें कानीं,
बनवावें मन धुंद रंगुनी काव्यसुधापानीं,
अंधाराचे पाश मनाचे हे गळुनी जावे,
चित्त वाटतें तरळ तुझ्यापरि खगबाळा व्हावें.

भवदु:खाच्या अनंत डोहीं परि बुडतों पाहीं;
शांति मिळेना क्षणभर जीवा विश्रांती नाहीं.
काव्यदेवता अंतरली मज गरिबाला आज;
काळ माझे वातावरणीं तुजपरि भरभरती;
पंख तुटुनिया विव्हल पडलों मीं धरणीवरतीं.

सुंदरतेच्या मोहनांत मन अमुचेंही नाचे.
बंधहि होती शिथिला. हरपतें हरपतें भानहि जगताचें,
जीव ओढतो वरवर जाया चैतन्यापाठीं;
हाय ! सुटेना द्दढ देहाची परि बसली गांठी !
दिव्यानंदीं म्हणुनि उमाळा दु:खाचा दाटे.
सत्यहि जो आनंद कल्पनामय केवळ वाटे.

अपूर्णताही यापरि मजला जरि बूडवी शोकीं,
चित्र मनोहर स्वगवाला परि मी तव अवलोकीं,
अपूर्ण अपुलें ईप्सित झालें पुर्ण दिसे जेथें,
मनुजाचें मन सहज पावतें आकर्षण तेथें.
तुजला बघतां भरभर उडतां कविता आठवली.
कशीबशी ती त्वत्प्रीतीस्तव आ कवनीं लिहिली

(अष्टदिशांचा गोफ)


Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:44.8730000