संक्रांत - नाना उत्सव मन्मना रिझविती...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
नाना उत्सव मन्मना रिझविती आनंद देती जरी
संक्रांतीसम एकही न करती उत्कंठ मातें परी
नाना संक्रमणें अखंड जगतीं कैशापरी चालती
त्याचें सुंदर चित्र हीच मजला संक्रांत ही दाविती १
अंधारामधुनी प्रकाशकिरणें आलीं पहा धावुनी
पापांचा करुनी विनाश पुरता मांगल्या झालें धणी
दु:खामागुनि ताप साहुनि मिळे हें सौख्य, ही शांतता
ऐसा हा मज बोध नित्य कथिते संक्रांत ही तत्वतां २
कां होऊं हृदयीं निराश मग मी संक्रांत ही पातली
स्वर्गीचीं नव वैभवें वितरण्या या मर्त्य भूमंडळीं
आतां जाइल मावळून सगळा अंधार विश्वांतुनि
सत्याचा जय शेवटीं वदतसे संक्रांत माझ्या मनीं ३
संक्रांती वद काय काय अपुल्या ओटींत तूं आणिलें
मातें दाखव गे कृपा करुनि हीं झालीं भुकेलीं मुलें
कांहीं संक्रमणें अशींच चतुरें, फेकूनि दे भूवरीं
नष्टप्राय समस्त हें तम गडे, स्वीय प्रकाशें करीं ४
शांतीची वसती जगांत करुनी अज्ञान विध्वंसुनी
नाना भेद मतें त्वरें सकल ही घेऊनि जा येथुनि
प्रेमाचें मधुर प्रशांत वसवी साम्राज्य विश्वावर
जेणें स्वर्ग जगांत येइल असें कांहीं तरी तूं कर ५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP