तृणपुष्प - मनोवेधका सृष्टिसतीच्या अग...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
मनोवेधका सृष्टिसतीच्या अगा चिमुकल्या बाला !
स्वागत तव, ये तृणासहित या भृतें डोलविण्याला १
सजल नील घन करोनि गेले अमृताचा वर्षाव;
चलत्तुणावरि तुला पाठवी प्रेमभरें मग देव. २
खेळ लाडक्या या सृष्टीच्या अंकावरती आतां;
घे आंदोलन सुखें ताल दे या विहंगांच्या गीतां. ३
या वाय़ूच्या प्रशांत लहरी, हे गगनाचे श्वास,
या प्रेमाच्या लाटा सुमना, चुंबनि घे तूं यांस, ४
म्हणोत कोणी तूं अवनीच्या उदरांतुनि आलास;
मज गमसी परि नभोविहारी देवदूत तूं खास. ५
ही मोहकता, तुझी फुला ही प्रेमनिर्भरा वृत्ती;
सदानंद हा उद्भवेल का या भूपृष्टावरती. ६
सदैव सस्मित, सदैव अपुला डोलत तूं असतोस:
दु;खसृष्टी कधीं स्पर्शली नाहीं तव चित्तास. ७
तुला तुडविती कितेक करिती तुजवरती आघात;
म्हणोनि नाहीं कधीं पाहिलें खिन्न तुझें मीं चित्त, ८
मैदानावर मी मित्रांसह या खेळाया येतों;
प्रतिवर्षीं तुज बघतों येथें, सवेंच वेडा होतों. ९
तुझीं चुंबनें असंख्य घेतों, धरितों तुज हृदयाशीं;
तृप्ति न हो परि चित्त धांबतें पुन:पुन्हां तुजपाशीं, १०
तृणपुष्पा चल, तुज कवितेच्या ठेविन उद्यानांत;
सख्या रहा तूं तिथें निरंतर, रंजव माझें चित्त. ११
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP