अरिसैन्याचा अफाट सागर, त्यांत गर्जतो दुर्ग भयंकर,
अग्निवर्षणीं वीर न्हाऊनी, क्षणोझणीं आदळती धरणीं
तो दुर्गांतुनि बाहिर आला, एकजात सरदारी भाला.
वीर पुरा बनला बेहोष, क्षणाक्षणां गर्जे रणघोष.
धन्य वीरहो, पुढतीं - पुढतीं, पाहुं बरें काळाची छाती.
वीरश्री नवरा तो गाजी, बेभान चरे समरामाजीं,
त्यांत नटे रिपु रक्तस्नानीं, भाग्यवान एकादा कोणी.
तडिल्लतेचा तुटुनी लोळ, क्षणामधें करपून भुगोल.
क्षणामधें नवतेज भरोनी, अग्निशिखा धगधगत्या नयनीं,
क्षणांत वरतीं ऊर उभारे, क्षणार्धांत हो भयाण सारें
दुर्ग फाटला उठला त्यांत, अग्निशिखेचा भयाण धोत.
काळच तो किंकाळ्या फोडी, वीर विराची धरितो नरडी;
काळाची विकाळ क्रीडा, तो मृत्यूचा भयाण कीडा,
तोंच पलिकडे उग्र कड्यांत, दाट धुराचे उठले धोत;
मागें पुढतीं एकच मारा शत्रु गजबजे क्षणांत सारा.
भंगभंगुनी हो धुळधाणी, शगुदळाचें जिरलें पाणी;
भान कशाचें ? नव नवसाचें, समरतीर्थ खर्या शूराचें
अन्य क्षणिं अंधार अघोर, तसा जाहला क्षणैक वीर;
क्षणार्धांत मधु सुषमा आली, क्षणीं रोष ये ययनीं गालीं,
नि:श्वसिता किंकाळी फोडी, परि न चळे ओठांची जोडी. -
अपूर्ण