निराशा - रात्र संपली, दिवसहि गेले,...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
रात्र संपली, दिवसहि गेले,
अंधपणा ये फिरुनि धरेला,
खिन निराशा परि हृदयाला - या सोडित नाहीं.
नित्यापरि रविकिरणें देती
रंग मनोहर सांध्यमुखीं तीं,
खळबळ ओढा गुंगत गीती - राईंतुनि वाहे.
सुंदर सगळें, मोहक सगळें,
खिन्नपणा परि मनिंचा न गळें,
नुसती हुरहुर होय जिवाला - कां न कळे कांहीं !
चंद्रविंब धरि अभिनव कांती,
मेघ तयांनीं धवलित होती,
परि हृदयीं नैराश्यकालिमा - मम खंडत नाहीं !
भोवर्यांत जणुं पडलों कोठें,
स्वप्न भयंकर दिसतें वाटे,
जीवित केवळ करुणासंकुल - नैराश्यें होई !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP