संध्यातारक - दिनरजनींच्या हृदयावरलें प...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
दिनरजनींच्या हृदयावरलें
प्रेमसंगमीं उदभवलेलें
मुग्ध तान्हुलें फूलच पहिलें !
कोमल किरणीं, नभ फुलवोनी, खेळ खेळतें त्यांत १
लहरींच्या सुंदर आंदोलीं
लहानग्याची शय्या केली,
रजनी ओंव्या गाउं लागली :- २
तूं लडिवाळा ! निज निज बाळा ! मातेच्या हदयांत. २
विश्वाचें विश्रांतिस्थान
तें माझ्या गुणिलाचें गान
अशी गडे अक्षय गाईन !
तूं वेल्हाळा निज निज बाळा या मम गीतसुरांत, ३
तेजाला आंदोलन देत
मंदपणें विचरे स्वर्वात
शांत शांत अवघ्या गगनांत
दिव्य अप्सरा, सुगुणागारा, प्रीतिगीति गातात. ४
त्या गीतींच्या मधुलहरींनीं
गुंगीं चढुनी या तव नयनीं
लागो डोळा तुझा म्हणोनी -
मीही गातें अस्फुट गीतें हृदयाच्या हृदयांत ५
झोंप कशी ती परी अजुनिही
आज गडे तुज लागत नाहीं ?
सांग करूं तरि आतां काई
बघ ना बा रे ! विश्वच सारें निजलें प्रभुह्रदयांत, ६
आन्दोलीं तुज नीज न येई
घेतें तर उचलुनि मी बाई
झांकियलीं ग मधुनेत्रें हीं
पदराखालें झोंपीं गेलें बाळ कसें इतुक्यांत ? ७
[मूळ कवितेंतील कांहीं पद्यपंक्ति गाळून व कांहीं बदलून ही कविता
मासिक मनोरंजनमध्यें शेवटीं हया स्वरूपांत प्रसिद्ध झाली,]
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP