शून्य - अंत:शक्ती प्रगट जाहली, द्...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
अंत:शक्ती प्रगट जाहली,
द्दष्टीही शून्यांत उतरली,
तेजोमय हृदयांत शांतता रात्रीची प्रतिबिंबित झाली.
वार्याचीं होवोनी अंगें
नादब्रम्हीं चित्त तरंगे,
विश्व चिरंतन, त्यांत विरे मन, स्वानंदीं गिरकी घेत.
ज्यांत स्फुरलीं विश्वें सारीं,
ज्यानें तीं प्रतिपाळित केलीं,
शून्य तेंच तें अनंत होतें पहिल्यानें अस्तित्वांत,
[जगदुत्पत्तिस्थितीलयाला
घेऊनि त्यांतुनी पुरुष उदेला
पुरुष एक तो मात्र स्फुरतो या सार्या ब्रम्हांडांत,
सहस्रशीर्षा त्या पुरुषानें
काळाचें विरचोनी ठाणें
व्योम बांधुनी अवकाशानें निर्मियलीं विश्वें त्यांत.]
दिव्य पसारा दिव्यच सारा
दिव्यांतुन उदयाला आला;
घरही त्याचें एकच साचें त्या दिव्याच्या उदरांत
कितेक त्यांतुनि येती जाती
अनंत विश्वें विशाल पुरतीं
उठती विरती लाटेसम तीं त्या पुरुषाच्या हृदयांत,
अनाद्यनन्ता ! अपरंपारा !
अनादिपुरुषा ! सर्वाधारा !
काय पसारा हा तव सारा आम्हांला न कळे येथ.
[तंड्लकणसम अनन्त जगतीं
दिव्य दिव्य ही नयनीं दिसतीं
येती जाती लीला नुसती गूढ तुझ्या साम्राज्यांत.]
शक्ति लोपली विरली वाणी
चित्त चाललें भलते स्थानीं
चिंतित असतां ही तव गाथा मज माझा झाला अंत
शून्य पाहतों सभोंवतीं हें,
दिव्य शून्यमय सारें आहे,
शून्यपणानें शून्य नांदतें उत्पत्तिस्थित्यंन्तांत.
त्या शून्यांतुनि उदया येती,
शून्याला अक्षय्या शोधिती,
जागृत सारे एकाकारें शून्याच्या आवर्तांत
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP