मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
सखया भ्रमरा सदैव तूं कमला...

भ्रमर आणि कवि - सखया भ्रमरा सदैव तूं कमला...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


सखया भ्रमरा सदैव तूं कमलावरि गुंग,
कवितेचा मी दास, पदाशीं तिच्याच असतों दंग. १

चाखुनि घेसी पुष्पांमधला तूं मधुतर मकरंद;
काव्यरसास्वादाचा मजला तसाच भारी छंद. २

प्रेमभरानें तूं पुष्पांवर सदैव गासी गाणें;
आळवितों मी कवितादेवी मंजुल आलापानें. ३

बागडसी तूं स्वैर मजेनें नभांत गरके घेत;
बागडतों मी सुज्ञ जनांना हर्षभरीत करीत. ४

समशीलाचे आपण दोघे, ये, ये भ्रमरा आतां;
उडूं बागडूं, फिरूं मजेनें नुरे कशाची चिंता, ५

ये प्रिय सखया, वनलतिकांच्या झोपाळ्यांत बसून;
गाऊं सुंदर गीत आपुलें, होऊं त्यांत विलीन, ६

ये, ये कमलीं प्रेमबंधनें बांधुनि घेऊं काया;
आनंदाच्या सुधासमुद्रीं जाऊं स्नान कराया. ७

वनराजींतुनि कुंजांमधुनि वेणुध्वनी करुन;
वात विहरतो; त्याचा जाऊं आपण पंथ धरून, ८

ये, ये स्वच्छंदानें मारूं नभांत उंच भरार्‍या;
गिरक्या घेऊं परमानंदें ओसरल्या ज्या सार्‍या. ९

रम्य गायनें वेधुनि टाकूं चाल दिशांना चारी;
अमृताचा वर्षाव करूं ये ईशाच्या बाजारी. १

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP