मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
आनंदी - आनंद गडे इकडे, ति...

आनंदी आनंद - आनंदी - आनंद गडे इकडे, ति...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


आनंदी - आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहिंकडे.
वरतीं - खालीं मोद भरे;
वायूसंगें मोद फिरे,
नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे;
आनंदी - आनंद गडे


सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदि ही हंसते आहे;
खुलली संध्या प्रेमानें,
आनंदें गाते गाणें;
मेघ रंगले,
चित्त दंगले,
चित्त दंगलें,
गान स्फुरलें,
इकडे, तिकडे, चोहिंकडे
आनंदी - आनंद गडे !


नीलनभी नक्षत्र कसें
डोकावुनि हें पाहतसे;
कुणास बघतें ? मोदाला !
मोद भेटला का त्याला ?
तयामधें तो
सदैव वसतो,
सुखें विहरतो,
इकडे तिकडे चोहिंकडे;
आनंदी - आनंद गडे !


वाहति निर्झर मंदगति,
डोलति लतिका वृक्षतती,
पक्षि मनोहर कूजित रे,
कोणाला गातात बरें ?
कमल विकसलें,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले -
इकडे, तिकडे, चोहिंकडे
आनंदी - आनंद गडे !


स्वार्थाच्या वाजारांत
किती पामरें रडतात;
त्यांना मोद कसा मिळतो ?
सोडुनि स्वार्था तो जातो -
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आतां उरला
इकडे, तिकडे, चोहिंकडे
आनंदी - आनंद गडे !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP