सौंदर्याचा अभ्यास कर ! - गाणें हें रचिलें असे जुळव...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
गाणें हें रचिलें असे जुळवुनी कोठून कांहींतरी,
वाणी सत्य तुझी असेल भरली द्वेषानलानें जरी,
रम्याकार चमकृतिप्रचुर हें ब्रम्हांड नेत्रीं दिसे,
खेळे कांहिंतरी तगांतुनि, मनीं गाणें तदा होतसे.
सूर्याचीं किरणें; सुनिर्मल तशा त्या तारकामालिका,
संध्येचे रमणीय रंग, उदयी सृष्टी मनोहारिका.
वृक्ष श्यामल पुष्पसंकुल चलद्दूर्वादलाच्छदिता,
वाहे शांतपथा सुरम्य सरिता कल्लोलमालायुता:
प्रेमानें अभिषिक्त चित्र मग त्या रामण्यविश्वीं दिसे,
चित्ताची, रमणीयता उतरुनी संगीत होतें तसें.
तें सौंदर्यच आणिलें जुळवुनी कोठून कांहींतरीं,
तंतें तें न दिसे म्हणून सखया, अभ्यास याचा करी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP