रामाचा पाळणा
निजरे बाळा घननीळा रामा सुखधामा पावन नामा ।
निगमादिक लपविती गुणसीमा ॥ध्रु०॥
बारे बारा वर्षाचा होशील या ठायीं ।
गाधिज नेईल दशरथांशीं सांगून शिष्टाई ।
मख रक्षुनिया राक्षसांत करशील धृष्टाई ।
मख धनु भंगे जनकाचा होशील जावाई ।
कैकईच्या कलहानें तदुपरी वनशाई ।
पंचवटीच्या होशील वसशील अमराई ।
बागुल येईल मग विसा भुजांची निजगाई ।
मेला काळा विक्राळ दशानन करुन काई ।
मोठा खोटा चोरटा धरी हा तुज डाई ।
दावील बापा मारीच कनक मृग चपळाई ।
बाईलबुध्या ह्या मागें थांबशील वनीं पाई ।
मारशील त्याला, मरतांना करील तो कुचराई ।
तुजसम अरोळी देईल तो उणीं नाहीं तिळराई ।
या शब्दानें जानकी म्हणेलच अग आई ।
लक्ष्मणजीला तुजकडे पाठवी लवलाई ।
गेला दोघे पाहून करील तो मग घाई ।
यतिवेषानें गांजी नेईल माझी सुनबाई ।
दशराथजीचा आडवा होईल मग भाई ।
करीलची तो जटायु मोठी मर्दाई ॥१॥
परि तो ह्याला कपटाची दाखवील चतुराइ ।
प्राणही वेंचुनि करणी करील तो असलाई ।
त्या पक्षाची होशील काय उतराई ।
बा रामा नेईल जानकीस तो खळ काळा ।
बा रामा मग तूं करशील यत्न जनकृपाळा ।
बा रामा माझ्या तान्हुल्या कीं चिमण्या बाळा ।
बा रामा मग तूं वानराशीं करशील गोळा ।
बा रामा त्याला मारशील सहबांधव मेळा ।
बा रामा आणशील मग जनकृपाची बाळा ।
बा रामा पुढती ही खटपट तुझीया भाळा ।
बा रामा तुजला या वयांत लागो डोळा ।
जो तो बागुल तूं असाची गिळशील सुख आम्हा ।
बाधे अमा पाजितें मारशील पुढें मामा । निजरे० ॥१॥