रुसूं नये कामिनी हसून बसून मसि बोल गे ॥ध्रु०॥
मजजवळी तूं धरुं नको शंका ।
क्षणभरिं शोभवी माझ्या अंका ।
रति मदनाची तूं मज रंका ।
होऊ नको भामिनी किती मन हें तंव खोल गे ॥
रुसूं नये कामिनी ॥१॥
दो दिवसाची गडे जिनगाणी ।
अबला कोणाची अशी गुणखाणी ।
श्रवण करावी तुझि मृदु वाणी ।
गेली सारि यामिनी किति करिशिल मज फ़ोल गे ।
रुसूं नये कामिनी ॥२॥
आवड मनाची मजवर व्हावी ।
स्वहित मनाची रति पुरवावी ।
सखे ह्रदयाची गति नुरवावी ।
तुज सौदामिनी घन कविराय अमोल गे ।
रुसूं नये कामिनी ॥३॥