सती सुमती गुणवती सुकुलजा रती परीस चांगली ।
अरे तुझे महिला, भोगजा वहिला, काय गरररर फ़िरसी चट लागली ॥
उगाच नको येऊं दगा बसल जिवलगा उमज अंतरी ।
अरे घरामधें भर्ता, प्राण काय वर्ता, आला तुज तरी ।
बरा दिससी किरे जरा न भय तुज घरांत धरशील करी ।
अरे अक्कल तुझी वेडी, कठीण किरे बेडी, पर सुंदरी ।
हाट करशी कानफ़ाटा येउनी सुतीवटा उपरी जरी धरी ।
अरे तुज अरे कोण तुज कैसा सोडाविल पैसा वेंचुनिया तुज तरी ।
उणी नजर घरधणी करील मज कुणी न म्हणतील बरी ।
अरे निखळ मी कवळी सासु माझी जवळी ।
काय करशील हे घर बुडल पडेल कशी पुरी ।
॥चाल॥
या छंदी भरी भरशील होईल गत कसी ।
मी उत्तम कुळीची सोनें बावनकशी ।
गावांत धणी श्रीमंत पड चौकशी ।
माझ्या घरच्यांची तुझी आधींच किरे बरकशी ।
अशांत निघ दुरदशा होईल किरे दिशा निवट उजळली ।
अरे तुझे महिला ॥१॥
गडे नयनीं जसे खडे शब्द रोकडे खुपती तुझे मनीं ।
आगे जळो जिनगाणी सोडिलें पाणी ।
तुजसाठीं जीव देईन सखे साजणी ।
आतां जवळ भुजलता कवल कुचगता समज निवळुनि ।
तुझे रंग लाली काय घर घाली तुझे तनमनधन सुदबुध नेली
सखे हिरऊनि ।
कंठी चिवळ कुचतरी आवळ हानुवटींत हिरवा मणी ।
तुझ्या गळ्याची आण गुंतला प्राण काय विधीनें घडिलीस सुंदर
विधीनें साधुनी ।
नका म्हणसी परी धक्का बसल रंग फ़िका होशील मग जुनी ।
अगे तुझे भरनवती आजवर नव्हती आतां कुठवर ठकविसी
कर सवदा समजुनी ।
॥चाल॥
तूं तिलोत्तमेहुनि उत्तम वपु कोमळा ।
आम्ही प्राणच तुझिया शरिरावर नेमिला ।
कांहीं विचार गडे असा कितीक मामला ।
का झिडकारिशीं मदनानें सोकविलें मला ।
उदास नको मन मदा पुरीव संपदा सकळ तुज दिली ।
अरे तुझे महिला ॥२॥
असा निपट काय पिसाळशील भरवंसा धरुनि हाटीकिसी ।
अरे जळो तुझी मस्ती टिकेल कसा वस्ती या नगरांतरी
नागरी कितीक कोण कसी ।
तुला न भय परी मला जपत पती भला हाटील तामशी ।
अरे अझुनि मी नक्की जवळ किरे चौकी चल दुर हो वेढ्या
उगा शरीर करविशी ।
उजागर नपती मजा करील मग दुजा कोण वदेल मशीं ।
अरे टिकल कशी अबरु, धरील कोणी गबरु मग पडेल ।
किरे जड येवढ्यावर तुझी खुशी ।
बुरी नजर तुझी गोष्ट काय बरी हासुनि जिरविसी ।
अरे निघुनी जा उगला प्राण हा जगला मानुन घे सुख संतोष
बहुत मानसी ।
॥चाल॥
ही सुंदर ज्याची त्यासच किरे लाभली ।
अशी गोष्ट कुठे नवखंडामधीं शोभली ।
कां झडी पडशील तुझी मती मजवर लोभली ।
झाली ती बरी झाली नको हालऊं जिभली ।
सुजात म्हण तुज अजात करी परी मज तशी न बोलली ।
अरे तुझे महिला ॥३॥