मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
का रे मनीं माधवाचे चर...

रामजोशी - का रे मनीं माधवाचे चर...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


का रे मनीं माधवाचे चरण धरा ना ।

किती कथितो हित कांहीं करा ना ॥ध्रु०॥

नरतनु लाभली हे सुकृतभराने ।

हरवितां आपुल्याचि कराने ।

चंचल मन नोव्हे स्थित निकराने ।

हे वदती श्रुतिशास्त्र पुराणे ।

झडकरी सांभाळावे हित चतुरानें ।

व्यर्थ कसे भ्रमता तिमिरानें ।

अंत:करणीं या मदन शरानें

भंगूं नये परमार्थ-पराने ।

सुरपती मोहिले हो विषयी गरानें ।

शाप दिल्ला मुनीच्या कुमराने ।

सुतदारा दिले बहु आदरानें ।

वंचती ते नुमजावे खरानें ।

त्या भवसिंधुच्या लहरी करांना ।

हरिगुण कीर्तनीं रंग भराना ॥१॥

भगवद्वजकाचा संग धरावा ।

मग तच्चरणीं निज देह पडावा ।

जो तो नर भवामाजी बुडावा ।

मग कधीसा परमार्थ रडावा ।

श्रीगुरुचरणीं नमुन खडावा ।

हरी हरनाम सुमंत्र पढावा ।

हे न करावे जेणे मदन चिडावा ।

सत्पथ हा तरी का बिघडावा ।

अरे तुमचा डोळा कधीं उघडावा ।

साधक हो मनीं भाव जडावा ।

का भवपाशीं हा देह पिडावा ।

भव भजनें सगळाची मढावा ।

हरिगुण गायकांच्या ह्रदयीं शिराना ।

सुखकर हा कविराय वराना ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP