मज वाटे हरिसी आज होरी बाई खेळावी ॥
काय करु गे रंगामध्ये तनु ही घोळावी ॥ध्रु०॥
बारा घरच्या रांडा बारा ।
न पडो देती माझा वारा ।
नेला बहार त्यांनी सारा ।
मी आहे कुळवंताची दारा ।
मानधारी म्हणून काय प्रभूने वगळावी ? ॥१॥
सांगुन धाडीन प्रभुला बाई ।
परि त्या बोलूं देतिल काई ।
झाली माझ्या मनाला घाई ।
त्या तर सार्या रतल्या पाई ।
दैव जिचे उघडते तिला प्रभु बोलावी ॥२॥
जाऊं दुरुनी पाहूं ।
कोठें आडून उभ्याने राहूं ।
हे दु:ख कसे मी साहूं ।
विष खाऊन मरुनि तरी जाऊ ।
रंग नको कविराय म्हणे करे ही घोळावी ॥३॥