कां मजसीं अबोला धरुनी ।
जाशि वांकडा घरावरुनी ॥ध्रु०॥
तुजसाठिं पतीस मी मुकलें ।
हातापाया पडुनि मी चुकलें ।
ममतेच्या करिं विकले ।
जसें निरुदक कमल सुकलें ।
गांजिशी उरामधिं पिकलें ।
शोखिं दाविसि तर्हा करुनी ।
कां मजसी ॥१॥
कां होसि असा तूं करडा ।
माझिसा जिवाचा अरडा ।
भाजिला प्राण त्त्वां हुरडा ।
मज असा भरडशिला किरडा ।
चिकणीला म्हणशिल कां बरडा ।
कोणा रांडेच्या भरि भरुनि ।
कां मजसी ॥२॥
कां अशा करिशि अन्याया ।
राहतें धरुनि मी विनया ।
हें विचार भल्याच्या तनया ।
तूं मला आवडशी कन्हया ।
कुणि कांहीं म्हणो जन या ।
गाइन कविराय तुला वरुनि ।
कां मजसी ॥३॥