भूतळांत जशि या स्थळांत यमुनाचळांत हिमनगबाळा ।
अशी भुवनत्रयिं कोणती दुजी वेल्हाळा ॥ध्रु०॥
मन सुमन करुनि विषवमन गणुनि रतिरमण शिवाची राणी ।
ही भजतां देते नित्य सुखाची खाणी ।
हिचे चरण धरुनि दृढ शरण तया भवतरण अशी शर्वाणी ।
पावते जना दिनासि पहा निर्वाणी ।
अति दुष्ट रोग परि पुष्ट रोग करि कुष्ट वयाचि न हाणी ।
हा महिमा कविजन ऐकतील वाखाणी ।
किती लुळे कितिक आंधळे किती जन खुळे पाय न पाणी ।
चालवी तयाही रोग्याची शिराणी ।
कांचना जपुनि किंचना म्हणति वंचना करावी ज्यांणीं ।
ही त्याला वंचिति माय मुलुखची शहाणी ।
क्षण मदोद्वत सदोष ही शुचि उदो उदो ही वाणी ।
तनुविक्षत करि कल्लोळ तीर्थांचें पाणी ।
जान्हवी गायमुख धारा, पडे अखंड ।
मातला दैत्यगण सारा, करि दुखंड ।
पावती वंश विस्तारा, शिरशिखंड ।
निजभक्त जनांची दारा, करि मुखंड ।
अर्चना तिच्या उपचारा, कधि न खंड ।
किति भुतें सरळ बाहुते फ़िरविती सतेज कुंकुम भाळा ।
कौड्याचे साज खेळती पोत झळाळा ।
भूतळांत जशिया स्थळांत यमुना़चळांत हिमनगबाळा ॥ध्रु०॥
अति लगट तयाला प्रगट तशी मग सगट जनाला तारी ।
हे विश्वकुंभिनी माय भक्तिची प्यारी ।
इथें बसून जनावर रुसून पाहते कसुन सधन लाचारी ।
दुबळ्याची भाकर म्हणे मला ही न्याहारी ।
नित्य उठुनि छळिति परि तुटुनि पडेना कुठुनि पुरविते ज्वारी ।
हा महिमा न कळे हिचा पार संसारीं ।
बेजरब जवळ काय अरब तथापि ही जरब जगामध्यें भारी ।
छपन्न देशिंचे लोक लोळती द्वारीं ।
ही चुका अगर चिंचुका सोडिना चुकाविल्या बनजारी ।
वाटेंतुनि यात्रा आणविते माघारी ।
ही तुका करित कौतुका नये समतुका हिच्या सुरनारी ।
येतिल हो कैशा पाहा कालच्या पोरी ।
मिरवितो छबीना नंदी, कधिं तुरंग ।
धांवति पुढें जनबंदी बहु फ़िरंग ।
कधिं मतंगजी आनंदी, इति फ़िरंग ।
कधिं पंकज गरुड स्कंधी, वहन रंग ।
कधिं हंस मयूर छंदी, धरि कुरंग ।
ही सदा सकळ संपदासहित श्रीपदासही जपमाळा ।
भक्ताची माय कनवाळू दिसे चिल्लाळा ।
भूतळांत जशि या स्थळांत यमुनाचळांत हिमनगबाळा ॥ध्रु०॥
कुचतटा कसुनि शुचिपटा घाटशीळ घटावकरिते माता ।
भक्ताची वाट पाहतसे येतां जातां ।
कुणी कसा असो जनपिसा विमानी बसा म्हणति सुर आतां ।
या पापनाशि तीर्थात जाउनी नाहतां ।
कुणि जपा न धरु कुणि तपा न करु परि उपाय षण्मुख ताता ।
या मुधोवास वंदिता मुक्ति ये हाता ।
ही धरा हा कागद करा दौत सागरास लेखक धाता ।
परि विष्णुतिर्थाचा महिमा न पुरे गातां ।
ही मायं वदों तरि काय सुरांचा राय तयावर सत्ता ।
स्नानार्थ धाडिलें अमृतकुंड भूप्रांता ।
भूयिष्ठ सुकृत करि पुष्ट असि हे अष्टतीर्थ रसवत्ता ।
नाशितें स्पर्श मात्रेंचि भवाध:पाता ।
घ्यां मनि हे दक्षिण काशी, खरी करुन ।
दर्शनांत पातक नाशि, करिं धरुन ।
सांडावी अमरी दासी हिजवरुन ।
राहतात सुर हिजपाशी पद चुरुन ।
कितिएक तयांच्या राशि मन भरुन ।
ही बया नवल काय दया करिल जलद या हरिल भवजाला ।
या कृपानदीचा नकळे पार खल्लाळा ।
भूतळांत जशि या स्थळांत यमुनाचळांत हिमनगबाळा ॥ध्रु०॥
ही अवा तिचा नित नवा साज किति हवा कविनें बोलावी ।
कोणत्या नराची दौलत हिशीं तोलावी ।
कधिं निजून उठते कधिं सजुन बसते परि असून तेज मोलावी ।
अशि कोण देवता स्थानाहुनी डोलावी ।
नवरात्र करुनि दृक्पात्र रसाची मात्र ग्रंथि खोलावी ।
मग मुक्ति तयाला गळां पडुन बोलावी ।
रणशौंड भारतिसी होड सारी पट सोड नित्य होवावी ।
ती भक्तवत्सला जाय भक्त बोलावी ।
ही अशी तरी हिची खुषी अभक्त ही ऋषी त्यास टोलावी ।
सप्रेम दीन दासार्थ नेत्र ओलावी ।
ही खरीच तुळजापुरीं अती सुंदरी विश्व गोलावी ।
मग युक्त हिचे बाळ ही माय सोलावी ।
ही मनिं हो चिन्मयबाला, जरि शिरल ।
काय जुरत यमाच्या बाला, पुढें शिरल ।
निज गुण जो गाइल त्याला, अनुसरल ।
तुळजेचे यशोमृत प्याला, नर तरल ।
दैन्य विपत्ति पापाला, स्थळ नुरल ।
कविराय म्हणुनि हिचे पाय धरुन गुण गाय छंद सुरताला ।
या कृपानदीचा न कळे हे दुर्लभ खळ, घोटितातचि लाळा ॥ध्रु०॥