मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
किती गोड किती गोड सुभ...

रामजोशी - किती गोड किती गोड सुभ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


किती गोड किती गोड सुभग सुंदरी । दृष्टीला पडली रे ।

पंकजासनी करीं घडली रे ॥ध्रु०॥

जिचें रुप चमक चांदणी । वयानें कवळी ।

केतकीपरीस ही पिवळी । कां बसे ग सरळ अंगुळी ।

जशी ती चवळी रे वाटे असावी जवळी ।

अमोल सुधारस धटी कटीस पट आवळी ।

नागिण जशी काय गव्हळी ।

काय वदूं वयाची भरती ।

विषयाची गत मत पुरती ।

सुंदरा नसे हिज परती ।

काय डौल दाविते मदनरसामध्ये जडली रे ।

माझिया मनामध्ये दडली रे ।

किती गोड किति गोड सुभग सुंदरी ॥१॥

शिरताज सकळ कामिनीमध्यें हा फ़ुटका रे

सुरतीचा लागला चुटका ।

घेऊं घोट घ्यावा वाटतो अमृत रसाचा घुटका ।

दाटला गड्या मज हुंदका ।

खुप रसाची निघुन जातसे घटका ।

बैसला मनामध्ये झटका ।

मदनाची समशेर सुटली ।

देखणी रति तशी नटली ।

कल्पना मनांतिल फ़िटली ।

कुच गोल मुखामध्यें बोल मधुर सार पडली ।

तारुण्य कदली रे ।

किती गोड किती गोड सुभग सुंदरी ॥२॥

शिरीं भांग सरळ वेणी काय पदाची सरणी रे ।

वर्णितां नये ती धरणी नग थाट वयाचा घाट नूपुर चरणीं रे ।

धन्य ही विधिची करणी मज सांग सख्या सदुपाय लागलो झुरणी ।

विषयाब्धितही तरणी रे ।

सखि मदन शराने अर्ची ।

ही असल कोणाच्या घरची । कसुन मारली बरची ।

संसार कशाचा जरि न हाताला चढली ।

कविराय जिला आवडली ।

किती गोड किती गोड सुभग सुंदरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP