सैरंध्रीशी कीचक वांछी कामुक सेनापती ।
रमाया जंबुक सिंहीप्रती ॥ध्रु०॥
म्हणे भुजिष्या पण त्यजुनी हे रंगमहालीं वसा ।
तुम्हां जे इच्छित मज तें पुसा ।
कष्ट करुनि बहु परसदनीं कां दु:खा भोगितसा ।
आहें मी सेवक तुमचा जसा ।
चंद्रहार मुद छंद कंकणे तन्मणी लफ़्फ़ा तसा ।
लखाकी तानवडाचा ठसा ।
हीर गरसळी वेणीं नग मणीं पैंजण आणि आरसा ।
पलंगी घेऊनि ऐसे बसा ।
॥चाल॥
शयनावरी जाऊं चला मंदिरी ॥१॥
श्रीनाथ सदगुरु पदा :१५
श्रीनाथ सदगुरु पदा भज न आपदा काव्यसंपदा जोड कंसारी ।
कर विचार पाहे काय आहे संसारी ॥ध्रु०॥
आहे संपत जोवरी सर्व तोंवरी आप्तसोयरीं चहाती धनधामा ।
गणगोत येती मग धांवुनि काका मामा ।
विषयामधीं होऊनि दंग उडविशी रंग निशिदिनीं संग चढविशी कामा ।
तनुधनमन खर्चुन तरुण मोहिशी रामा ।
किती यामधी जाशिल तूं नटून रहा दुरुन हटकुन गुरुपदीं ।
झटून साध निज प्रेमा ।
कांहीं उमज शेवटीं कोणि नये बा कामा ।
॥चाल॥
या दुष्कर्मामधिं सारे वय खचल ।
हा विचार बारे आतां कधिं सुचल ।
नरदेह कांचही नकळे कधिं पिचल ।
धरि सदगुरुची तूं कास धरी सहवास होउनी दास दुष्कृति सारी ।
गुरुगृहीच अक्षयि भक्ति ठेव तूं सारी । कर वि० ॥१॥
गुरुकृपेची येशी बारे नांवरुपाशी ।
सुस्वभाव निजमनी भाव तरीच निभाव धरी दृढ भाव सुसंतापाशीं ।
ते समूळ छेदितील प्रपंच संतापाशी ।
गुरुपाय न करतिल काय रक्षिती काय मायबापाशीं ।
॥चाल॥
या प्रपंच घोटाळ्यातून रहा तुटक ।
किती जन्मभरी विषयाची तरि चटक ।
आतां पुरे पुरे डोहांतूनी चाल सटक ।
हे सर्व मायेचे कटक यांतूनि झटक करुनि घे अटक नरतनु सारी ।
बा सफ़ळ विषयाची कशी अजुनि नयेची शिसारी ॥
श्रीनाथ सदगुरुपदा भजन आपदा कर विट० ॥२॥