अशि कशि रे तुझि होरी हरि आवळून धरिशिल उरीं ।
पडेना अमुचि रे येथे पुरी ॥ध्रु०॥
नाहिं अब्रुची चाड तुलारे आम्हि गरति बायका ।
काय हा झोकिशि गुलाल बुका ।
सारें अंग रंगांत बुडालें काय म्हणेल घरिं अका ।
न कांहिंच बोलसिल मैंदा बका ।
सासुसासरा घरिं घरच्याला कळेल जनामधिं टिका ।
होइल मग अबरुस बसला धका ।
जळो तुझी रे पिचकारि नको काय खेळ हा निका ।
मारला जाशि एखादा फ़ुका ।
हार तुटोनी गळतात मणी धनीपणाचा शिका ।
मुखावर घेसि जनांचा थुका ।
आम्हि गरती अब्रुसाठीं जाऊं मरुन ।
चल नंदापाशी नेतें तुजला धरुन ।
रंगाचें पाणि रे डोळे गेले भरुन ।
काय हरी खेळशिल अमुचे रे कुच चुरुन ।
तुझि मस्ति रे थोड्या दिवसांत जाइल जिरुन ।
थांब तुला ही खोड जंव न रे लागुन बसली खरी
काढितें, खेळ न एवढ्यावरी ॥१॥
ऐकत होतें फ़ारच तुजला; तूं तर व्यसनी पुरा ।
जन्मला यदुवंशामधिं हिरा ।
अरे चांडाळा सोड मला रे आग झाली उरा ।
चोळिशी काय गव्हारा गुरा ।
काढ गळ्यांतिल हात कसा तूं जाउनि निजमंदिरा ।
आणितें आपुल्या पतिला घरा ।
मग होरी ही तुझी निघल चुडे फ़ुटुन हो चुरा ।
जळो गाई का आलें परमेश्वरा ।
कान दुखवला थांब तरी कां ओढिशि रे फ़रफ़रा ।
कशाचा खेळ जुलूम हा खरा ।
ती असल एखादी तुजसारखि तुसि झटल ।
जी भली कुलीना ती तर तुजवरि विटल ।
या दुष्कर्मे गोकुळची वस्ती उठल ।
हें पाप जोडिशी कोण्या जन्मीं फ़िटल ।
हा रंग तुझा मजपाशि कसा रे पटल ।
कधिं घरच्यांनी जुलूम करुन माझि न धरली निरी ।
कवण तूं परनर यमुनातिरीं ॥२॥
यापरि हरिला तिणें जरब दिली परी वरी आंतुली ।
वेगळी प्रेमरसाची किली ।
स्त्रीजातीला कोण रे म्हणल भोळी अथवा भली ।
कृतादिकयुगीं मग हा तर कली ।
परमात्म्याची मूर्ति तिणें उरीं तर कसीं लाविली ।
रसामधिं पुनरपि फ़ुसलाविली ।
श्रीकृष्णातें म्हणे तुझि उगि प्रीती पाहिली ।
खेळाया रोखिली गेली ।
श्यामा रामा उमा चीमा भिमा यमा या मुली ।
जमाउनि रमा दमाची आली ।
कटी कच्छशिरावरी ती जुटून ।
त्या एकदम सार्या हरिवरि पडल्या तुटून ।
घेतला उसंत न वसंत सगळा लुटून ।
रंगलूट जहाली कंचुक गेले फ़िटून ।
या होरीची कोणि तर्हा बांधिल कविजन खरि तरी ।
नये या कविरायाची सरी ॥३॥