मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
नरजन्मामधिं नरा करुनि ...

रामजोशी - नरजन्मामधिं नरा करुनि ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारायण गडी ॥

तरिच हे सार्थक मानवकुडीं ॥ध्रु०॥

बा चौर्‍यांशी लक्षवेळ संसार पडला गळां ।

चिंतेचा पिकला मळा ॥

दार-धनाचा लोभ टाकुनी झटकर हो मोकळा ।

हा कसा उकलिशी पिळा ॥

धनानिमित्तें जनापुढें तूं दाविसि नाना कळा ।

किति तुला मुलांचा लळा ॥

तूं पडूं नको याचे भरीं ॥

तुझ्या हें खापर फ़ुटतें शिरीं ॥

तुला मी गोष्ट सांगतों खरी ॥

आतां कर तांतडी । ही पुन्हा नये बा घडी ॥

नरजन्मा० ॥१॥

निपट बावळा या विषयाच्या मागें लागसि कसा ॥

कां होसी बा धडपिसा ॥

वयोधनांची किति चंचल गति कां धरिशी भरंवसा ॥

हे सकल मनाला पुसा ।

उदरासाठीं दुर्धनिकांच्या पुढें पसरिशी पसा ॥

किति उगाळशिल कोळसा ।

हें तुला शिकविलें कुणी ।

दयाळू नरनारायण धणी ।

अझुनि तरि करि बा ही घोकणी ॥

विषयवल्लीची जडी । तूं म्हणशील साखर खडी ॥

नरजन्मा० ॥२॥

नवस कामना करुनि मनामधिं म्हणशिल पुरुषोत्तमा ॥

दे संतत विपुला रमा ॥

विषयवासना तुला तुटेना मानसिं या संभ्रमा ॥

काय पुढें बोलशिल अधमा ॥

किती प्रपंचामध्यें फ़िरुनियां पावसी विफ़ल श्रमा ॥

कां न करिशि भजनोत्तमा ॥

हे कसें तुला भावलें ॥

करावी अचला दारामुलें ॥

मळेना पुढती हें बाहुलें ॥

कविरायाची उडी । दाविल भवार्णवाची थडी ॥

नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारायण गडी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP