घडीभर या हो माझ्या घरासी राया ॥ध्रु०॥
कां मन आपुलें खवळुनि जातां ।
मी नव्हे कामिनी तसी गुणवंता ।
किती मज गांजावे सख्या गुणवंता ।
बिन अपराधें कां दुखवितां ।
मी वंदिते आणि तुमच्या हो पायां ॥१॥
टाकुनि देतां कां ममतेला ।
दीन जनावरी कां हट केला ।
कोप कशामुळें हा मनीं केला ।
नव तनुसंगमीं मदन भुलेला ।
रंग हा घ्या तुम्हा जोगा भोगा काया ॥२॥
संग न हो परि बोला मृदु वाणी ।
हास्य करुनि पहा मी तुमची राणी ।
माझ्या कधिं न तुटे डोळ्याचें पाणी ।
तव गुण गातें अभिनव गाणीं ।
या कि हो कविराया हा भ्याला वायां ॥३॥