मायबापाचा श्रीकृष्णाचा विचार मोडुनि बळिदेवे ॥
दुराग्रहानें निश्चय केला सुयोधनाला मज द्यावे ॥
भाउ नव्हे ग बाई बाउच केवळ भाउनि मनांत उमजावे ॥
वडिल बंधु परि अडिल खोडकर खळाकडिल हे समजावे ॥
हंसा टाकुनि काय वायसा मुक्ताफ़ळ हे अर्पावे ॥
ब्राह्मण ढकलुनि चांडाळाला कां म्हण जेऊ घालावे ? ॥
जन्मांतरिचा वैरी भाऊ अशा वरुनि हे वळखावे ॥
अपाय याला उपाय न सुचे काय करावे विष खावे ॥
दुर्योधन खळ मेला गेला उलथोनि तो पोटभरा ॥१॥
भाऊजीचा निरोप घेऊनि गेला तीर्थे हिंडपिरा ॥
कोणी जागा न कळे आहे जागा किंवा नीजसुरा ॥
तडी तापडी किंवा भापडि होउनि गेला काशिपुरा ॥
आविडनें कीं कावडि नेल्या शेतुबंध रामेश्वरा ॥
गंगा यमुना तपती तुंगा कृष्णा रेवा हरिद्वरा ॥
यांच्या पुलिनें रम्य साधुच्या मंडळिमध्यें असल खरा ॥
काटक बाई कर्नाटक व्यंकटपति पाहुनि करवीरा ॥
पंढरपुर भूवैकुंठाला आला हरिजन माहेरा ।
पुंडलिकानें कान फ़ुंकिला केला चेला संत पुरा ॥२॥
किंवा अमराधीशें नेला अमरावतिला निरकुमरा ।
तिलोत्तमा, उर्वशी मेनका रंभादिक ज्या सुराप्सरा ॥
असला सुंदरा ठसला + सला भुलवुनि नेला त्यांनि घरा ॥
रुसला बसला घुसला जाउनि फ़सला तेथें खराखुरा ॥
अथवा झाला असेल साधू शोधुनि सगळी वसुंधरा
प्राणाधिक तो आणा घालुनि आणावा वर पार्थ हिरा ॥
अर्जुन घेऊनि कशास कोणा गर्जुन मज भय नाहि जरा ॥
अर्जुन वर्जुन देह विसर्जुन वाटे मजला मृत्यु बरा ॥
तो बैरागी मी बैरागिण होउनि जाइन दिगंतरा ॥३॥
बहर नवतिचा कहर करितसे लहर आलि बाइ धरा धरा ॥
पळपळ युगसम वाटे अनुभव पहिला वहिनी मनीं स्मरा ॥
काल रात्रि म्यां स्वप्न देखिले जणू पूजिते गौरिहरा ॥
गौरव करुनि गौरीनें हा प्रसाद दिधला हार तुरा ॥
कौरव पतिला रौरव होइल बोले ऐसी दिव्य गिरा ॥
जाइल बाइल करुनी येइल ती तुजला ठिक नर नवरा ॥
यती नव्हे या वरुनी गमतो पति अर्जुनजीचा चेहरा ॥
खुणा पाहता उणा नसे तिळ कोणा सांगुन तुम्हि होरा ॥
शुभ चिन्हे ही देही सांगति कविरायाचा ठिक होरा ॥४॥