कारें हें कळेना तुशीं हरीची अगाध माया ।
आर्जविशील पैसा मानुनि सार काया ॥ध्रु०॥
आला पेच माथां माझ्या आतां कधिं जाण होसी ।
रांडापोरासाठी वेड्या ऐशी तनु घालविसी ।
पुढें तुझी व्हावी कसी गती निरयासि जासी ।
अरे बळ धरुन भवासी झोंबती काय वाया । कारे० ॥१॥
आता काय बोलूं तुसी तुझी तुला सोय नाहीं ।
मनुजतनु थोडी बापा पहा अवकाश कांहीं ।
तुझा कोण साथी आहे बारे विचारुनि पाही ।
असा कां लोभीजनाच्या लागसी नादी वाया । कारे० ॥२॥
तुझी बुध्दी थोडी बापा तुला झाली भ्रांती मोठी ।
पडूं नको इच्या पेचीं त्रिगुणा हे फ़ार खोटीं ।
इच्यापुढे कांही नोहे ब्रह्मादिकांच्या ही कोटी ।
आटोपिशी कशानें कविरायाच्या कुळा या । कारे० ॥३॥