वदनीं श्री विघ्नविनायक गावा । ह्रदयीं वागावा ॥ध्रु०॥
ज्याचे पदपंकजरज सुरसंघें । मस्तकीं धरावें ।
ज्याच्या नत भक्त जनाच्या संगे । भवताप सरावे ।
ज्याणें सिंधुरासुरादिक भंगे । रिपुगर्व नुरवावे ।
तो हा गणराज वरद मागावा । रंगी रंगावा ॥१॥
शुंडा-भुजदंड-सुमंडित ज्याचे । कुंडलें लटकतीं ।
श्रवणीं रंगामध्ये तुंदिल नाचे । पाऊलें पटकती ।
भुलले गण किन्नर गंधर्वाचे । गायनीं अटकती ।
ऐसा गजवदन काय सांगावा । स्वमनिं लागावा ॥२॥
हस्तीं वर परशू मोदकांकुश हे । शोभतात चारी ।
माथा मणिमुकुट झळाळुनि राहे । दुर्वा उपचारी ।
अंगी सर्वोत्तम सुषमा वाहे । विद्यामृत चारी ।
वाटे कविराय सदा भागावा । तत्पदीं जागावा ॥३॥