येऊनिया नरजन्माशीं । कांहीं तरी जाण बारे ॥ध्रु०॥
रक्षुनियां धनसुतदारा । निजकरणें शोषिलीं ।
भवतालीं मिळउनि बारा । ही चोरें पोषिलीं ।
न देतील तुजला थारा । त्त्वा मोठीं तोषिलीं ।
किती सांगूं मानवा रे । येऊनिया० ॥१॥
संसारची सारा खोटा । कां होसी बावरा ।
या उदमा येईल तोटा । बा कारे हावरा ।
काळाचा बसल्या सोटा । मग म्हणशील आंवरा ।
दुर्मतिला खाण बारे । येऊनिया० ॥२॥
तूं म्हणशी माझी रामा । सुकुमारी गोरटी ।
परिणामी तुझीया कामा । येइल काय चोरटी
वंचुनिया कवडीदामा । घेतील हीं पोरटीं ।
कविराया मानवारे । घेऊनिया नरजन्माशीं काहीं तरी जाण बारे ॥३॥