कुठवर हा भव पुरे पुरेरे । नाहीं यांत किमपि सौख्यरे ।
सांगून चुकलों परंतु न तुझी खटपट सरे सरेरे ॥ध्रु०॥
ही तनु तुजला काय जिरे जिरेरे । हे विषय दिसती साजिरे ।
हे मदमस्त गजरथवाजि रे । आले असती अजी रे ।
सावध हो मनीं विचार न करिसे यांतील कांहीं तरी उरे उरे ॥१॥
जेथील धन तेथें विरेविरे । समजुत कधी व्हावी रे ।
अशी पुन: तनु यावीरे । काही विरक्ति चित्तीं धरावी रे ।
यासाठी ही वळख करुनि घे । बाबा जीव जेणें उधरे धरे ॥२॥
कामादिक रिपु खरे खरेरे । नच यास सलग राख रे ।
जाहले केश सकल वाख रे । कांहीं भजन सुधा चाख रे ॥
यासाठी कविराय म्हणतसे तार भवार्णव हरे हरे ॥३॥