क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥ध्रु०॥
निशिदिनिं धुंडिता परि सुख नाहीं ।
उगिच तनु दंडिता त्यांत न कांहीं ।
भगवें गुंडाळिता खवळती सहाही ।
यामुळें सांगतो सोडा मोडा कामा ।
क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥१॥
कां मनि वाहतां ही भवचिंता ।
दिननिशीं पाहतां अभिनव संता ।
सुखमय राहतां जरि अनहंता ।
मोहुनी गुंतला खोट्या मोठ्या रामा ।
क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥२॥
धनसुत बायका ठका या खळसंगा ।
निवटुन आयका या कीर्तनरंगा ।
मन्मथसायकाचा हा दंगा ।
जा किरे कविरायाच्या साच्या धामा ।
क्षणभरि गारे कोणी क्षणभरि हरिच्या नामा ॥३॥