हरि मथुरेला आजि कां गडे जातो ?
कांहीं कळेना कधीं परतुन येतो येतो ॥ध्रु०॥
आम्ही तरी गोपी हरिवांचुन मेलों ।
दंडधराच्या घरीं गेलों गेलों ।
अक्रुर मेला याला पाहुनि भ्यालों ।
कांहीं सुचेना दंग झालों झालों ।
दिननिशीं आतां विरहातुर बसलों ।
काय करावें नाहीं धालों धालों ।
शाम सखा लोपला गे अंतरीं ।
पहा याणें सोडिलें आपणास सुंदरी ।
प्राण आता मोकळा वार्यावरी ।
हाय हाय बोलूं काय कविराय विनवणी करतो ॥१॥