धीर धरी नंदाच्या पोरा रे । ॥ध्रु०॥
काय हारखली माय तुला व्याली । कृष्णसर्पा जशी विषली व्याली ।
चोर जार परद्वार बाहेर ख्याली । घट घट दधि मटमट गिळी ।
फ़ट फ़ट जळो कटकट रे ॥१॥
दुष्ट जन्मलासि जळो तुझी मस्ती । तूं तर दांडगा मी रोड मशि कुस्ती ।
कशी टिकल गोकुळचि हे वस्ती । धड धड करि ह्रदय झटशी ।
कडकड किती बडबड रे ॥२॥
गुरे वळ जा घेऊनिं हातीं काठी । काय समजुनी लागसी माझ्या पाठीं ।
तुझी ठाव आहे कविराय मुखें धाटी । उठ उठ किती हटतट वदूं ।
खटपट करुं खटपट रे ॥३॥