खोडा हा संसार जनाचा । सारा लोभचि दारधनाचा ॥ध्रु०॥
कोणाला अनुताप घडेना । कोणीही साधुपथांत पडेना ।
कोणाचा अभिमान झडेना । कोणाची मतिही मुरडेना ।
कोणी श्रीहरीला आवडेना । कोणावाचुनि कोणी अडेना ।
जपाला काय करितो पुण्य । कळेना पाप ।
मूढ असे हे नरकीं पडती आपोआप । कांही मार्ग न साधुपणाचा ।
खोडा हा ॥१॥
नाना जन्म अशाच भवाला । संपादुनि कोणी न निवाला ।
कांहीं लाज नसेचि जिवाला । भोगूं पाहती या विभवाला ।
हर्षे मागति सांबशिवाला । मोठ्या संततिच्या प्रभवाला ।
कुपामाजीं अमार्गे जसे पडावे अंध । विषयीं पडुनि पावतसे
भवाला बंध ।
दगा नेणति या निधनाचा । खोडा हा ॥२॥
मायापाश न कसा कळावा । आतां काम कधीं आकळावा ।
ऐसा कायही काय मिळावा । मोहाच्या चरकांत पिळावा ।
याचा अरिगण कैं निखळावा । दारा घालति यास कळावा ।
प्राकृतजन हे मानसिं धरिति नाना काम ।
कन्यासुतादि वदनीं कैंचें हरिचें नाम ।
कोठे हो कविराय मनाचा । खोडा हा ॥३॥