मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
ब्राह्मणी राज्य जोरदार ...

रामजोशी - ब्राह्मणी राज्य जोरदार ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


ब्राह्मणी राज्य जोरदार घोड्यावर स्वार होते शिपाई ॥

जबर सद्दी कैकांनी पाहिली शत्रु ठेविले नाही ॥ध्रु०॥

श्रीमंत पेशवे प्रधान बहु प्रीतीचे ॥

अष्टप्रधानामध्यें उतरले मर्जीत महाराजांचे ॥

वसविले त्यांणी पुणें शहर टुमदारीचें ॥

जागो जाग बांधिले दाट नळ पाण्याचे ॥

ठायिं ठायिं शोभत हौद एक फ़र्म्याचे ॥

धनी कृपावंत प्रभु कल्याण करी रयतेचे ॥

लंकाच पुण्यामध्यें लेश न दारिद्र्याचे ॥

शहरांत घरोघर सावकार गबर घरचे ॥

सरदार एकाहुन एक श्रीमंतांचे ॥

लढणार शिपाई किती सांगू मी वाचे ॥

हत्ती घोडे रथ अंबारी थवे पालख्यांचे ॥

सरकार वाड्या भोवताली झुलती बहारीचे ॥

जागो जाग वस्ती भरदार गर्दि बाजार कमती नसे कांहीं ॥

पुणे शहर अमोलिक रचली अशि दुसरी नाही ॥ब्राह्म ॥१॥

उत्तम पुण्याभोंवती शोभती बागा ॥

शहरांत हजारो स्वार घोड्यांच्या पागा ॥

भले भले धनत्तर वाडे हवेल्या जागा ॥

आळोआळी झळकती एक सारख्या रांगा ॥

वर्णिता गोड वाटतें किती तरि सांगा ॥

शहरात सुखी अवघे क्वचितची भीकमागा ॥

तेही गेले कोठें धर्मास करिनारे जागा ॥

शिंद्याचा ज्यान बत्तीस फ़्रेंच नालुंगा ॥

गाईकवाड सरदार येती प्रसंगा ॥

धांवती रणांगणी मानकर्‍यांचा चुंगा ॥

शिरकेल कोणता काळ कोरण्या भुंगा ॥

(सहजात जिरविती सर्व तयांचा भुंगा ॥ )

गोखले बापू तरवार बहादर फ़ार लढाईंत जाई ॥

शत्रुची फ़ौज जर्जर करितसे लवलाही ॥ब्राह्म ॥२॥

साक्षांत विष्णु अवतार पेशवे कूळ ॥

संपूर्ण महीचे भूप कांपती धाक दरारा प्रबळ ॥

सखोपंत देवराव विठ्ठलनाना काळ ॥

शहाण्यात साडेतीन शहाणे (बुध्दीचे) सबळ ॥

सेवेत सर्वदा श्रीमंतांच्या जवळ ॥

होळकर भोसले शिंदे मानकरी सफ़ळ ॥

तलवार बहादुर करिती शत्रुची राळ ॥

स्वारीच्या भोवती पटवर्धन मंडळ ॥

युध्दांत रणांगणी जसा आगीचा लोळ ॥

बहुनामी पल्लेदार तोफ़ांचा कल्लोळ ॥

जे जाल जुंबुरे बाण करी वळवळ ॥

सरदार सभोंवती दाट पसरती तळ ॥

घोरपडे रास्ते सरदार पुरंदरे स्वार पानशे पाहीं ॥

फ़डणीस नानांची जरब भूमंडळी राही ॥ब्राह्म ॥३॥

पर्वतावरती पर्वती स्थान त्यावरती चौघडा ॥

तळापर्यंत पायर्‍या जावे धडधडा ॥

अनुष्ठान पंचपक्वान्न पडेना खाडा ॥

पुजारी पूजिती उमामहेश्वर जोडा ॥

पीत वर्ण सोन्याच्या मूर्ति नव्हे या बाडा ॥

पहार्‍यास शिपाई उभे पेटवुनि तोडा ॥

रमणाहि ब्राह्मणांसाठी बांधिला केवढा ॥

श्रावणमासि खर्च तो कोट्यावधि तोडा ॥

पुढे तळे त्यामध्यें लहान बेटाचा तुकडा ॥

गणपती त्यांत पलिकडेस आंबिल ओढा ॥

ग्रामांत तुळशी बागेत बेत ही जाडा ॥

बुधवार पेठ बेलबाग नजीकची वाडा ॥

जागोजाग मौज अनिवार नसे अंतपार वर्णू तरि काई ॥

कविराय म्हणे धन्य धन्य पेशवाई ॥

ब्राह्मणी राज्य जोरदार ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP