बाई नंदाचा मूल माझ्या डाई हो । अगे डाई ।
आतां पडला मी करुं तरि काई ॥ध्रु०॥
माझ्या घरच्यांची फ़ार कठिण मर्जी हो ।
याला नुमजे हा बायकांचा गर्जी ।
हात जोडोनि करुं किति अर्जी ।
सासु माझी कोपाग्निमाजी मर्जी ।
असा कोण नाहिच याला वर्जी ।
हाचि जाहला या गोकुळांत फ़र्जी ।
आता उरली ती काय जिंदगाणी ।
याची किर्तीची गाऊं किती गाणी ।
कोणापाशी सांगावी गार्हाणी ।
गांव सोडूनि जाऊं याच्या पायी ।
बोलूं जातांना करितो ग घाई ।
बाई नंदाचा मूल ॥१॥
दिनराती हा सर्व काळ जाची ।
सीमा जाहली याच्या काळजाची ।
तुला सांगू गोष्ट मानसाची ।
याची नोव्हे कांही रीत माणसाची ।
ज्याला गोडी लागेल ज्या रसाची ।
त्यात पटकी पावेल जार साची ।
घात मोठा याचा यांत कोवळ्याचा ।
विश्वामित्रादि ऋषि सोवळ्याचा ।
पाड तेथे या किति गोवळ्याचा ।
याणे राखावी गुरे वत्स गाई ।
मला झोंबावे काय हा गाई ।
बाई नंदाचा मूल ॥२॥
दह्यालोण्याची असो जळो चोरी ।
माझ्या रडवितो धरुनियां पोरी ।
आतां बोलावें यांत काय थोरी ।
उगा दाखवितो हाकिमाची थोरी ।
सार्या गोपीमध्यें मीच काय गोरी ।
मला आडवी म्हणे खेळूं चल होरी ।
नित्य याचा हा जाच कोण सोसी ।
जावे येथून दहावीस कोसी ।
भला हाटकी पराव्या नव्या बायकांसी ।
मायबापाची आण याला राई ।
काय घालूं कविरायजीची द्वाही ।
बाई नंदाचा मूल ॥३॥