घडिभर तरि सदनासी । येऊन जा माझी असोसी ॥ध्रु०॥
कशी तशि खटनट परि । तुझी म्हणविते ।
पदीं तुझ्या तनमनधन झिजवितें ।
तुला किति रतिपतिगति सुचवितें ।
जिवाच्या तळमळीमुळें आळवितें । होईन दासी ॥१॥
तत्पदीचें रज म्हणविलें । सख्या त्त्वां घरच वर्जिलें ।
विरहानें दु:ख पिकविलें ।
तुझें मन कसें मजविषयीं निष्ठुर झालें । रुसून बसलासी ॥२॥
परोपरीनें असा विनविला ।
नारीनें मोहुनि नेला । सुखशयिनीं प्रेमें भोगिला ।
कविराय आनंदी झाला । कवन हे सरसी ॥३॥