श्रीरंग गोपिकोत्संग धरुनि करि रंग हरी हा बाई ।
कुंजांत मातला वसंत सांगुं मी काई ॥ध्रु०॥
तो कंजरसाचा पुंज बांधिला गुंज तशामधिं मुरली ।
अति मंजुळ हरिनें वदनसरोजीं धरली ।
थयिं थयिं नूपुरें वाजती चरणीं झणतकृति भरली ।
त्या रसिकव्रजांतिल सुंदर तितुकी सरली ।
अति मंद शितल सुगंध जाति निष्पंद मरुत्कृति भरली ।
ती शोभा नच वर्णवे रमा अवतरली ।
रंगांत गोपिच्या पडल्या, किती उड्या ।
किती रासमंडळी जडल्या, होत्या सड्या ।
किति श्रीहरिच्या तोंडी देति विड्या ।
या सार सुखां नाहिं पार काय संसार हरीच्या पायीं ।
या चित्तवृत्तिला दुजें सुचेना कांहीं ॥ श्रीरंग ॥१॥
तूं जरी रुसुनियां घरी मंचकावरी बैसलिस भामा ।
तरि काय हरीला उण्या सुरसिका रामा ।
हा भाग तुझा तरी लाग नको धरुं राग रिझवि गुणधामा ।
जी रसिक नव्हे ती स्त्री न म्हणावी पामा ।
किति मुली मिळाल्या हुलीस त्याच्या कुळीं किं कुशला वामा ।
श्रीमाधवसंगें गडे पुरविती कामा ।
किति गुलाल केशरीरंगें, भिजविल्या ।
किति मानवती मदभंगें, निजविल्या ।
किति देउन रतिसुख संगें, रिझविल्या ।
हा हाट हरीचा थाट गोपिला वाट सुचेना कांहीं ।
या मुखें वदूं किति पिचकार्यांची घाई ॥ श्रीरंग ॥२॥
मधुकरी पंकजावरी तशा एकसरी धावल्या रमणी ।
गेलि उमा रमा सखु साळू मैना चिमणी ।
चल ऊठ जाऊं रंग लूट पडूं नये तूट हरीच्या चरणीं ।
यापरि मग समजुन गेल्या दोघी गडणी ।
त्यापाशि मिळाल्या रसीं उतरल्या मुशी नंदजाचरणीं ।
हा स्त्रीजन परि भगवंत कॄपानिधी करणी ।
ही वसंतमाधव होरी, कोणि शिका ।
जरि गातां हरिची थोरी, भवभी कां ।
जर वर्णन करितां चोरी, करुं नका ।
हें पर्व पावलें सर्व नको धरुं गर्व तरी कविराया ।
धनवान कोणाचे बाप कोणाची माया ॥३॥