मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
अरे सख्या समज धर काही...

रामजोशी - अरे सख्या समज धर काही...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


अरे सख्या समज धर काही । हरिवांचून संसारीं ।

कुणाची भर करशिल सारी ॥ध्रु०॥

अरे सख्या मानसिल माझे धनसुत हे मतिमंदा ।

मनामध्यें न धरशी गोविंदा ।

अशा नरदेही स्वहिताचा कर धंदा नको मन विषयवार तिंदा ।

निदानी तुजला ।

तारिल हा कंसारि इतर भोंदु न दुजा तारी ।

समज धर कांही । अरे सख्या ॥१॥

अरे सख्या जोडशिल पैसा धांवुनिया दिनराती ।

परावीं घरिं बैसुन खाती ।

विचारुन पाहे कुणी आहे सांगाती ।

तुला वाटते ही मज गाती ।

धरावा चित्ती बा एकचि गिरीधारी ।

म्हणू नये दुसरा शेजारी ।

समज धर कांहीं अरे सख्या समज धर० ॥२॥

अरे सख्या ओढितील सारे धन नाहीं करीं अडका ।

जरेने कच होतिल सडका ।

कुणाच्या दारीं बा लोळशी मग रडका ।

शरीरीं गद देतील धडका ।

स्वहित कविराया विसरुनिया अवतारी ।

कुणाची भर करिशिल सारी ।

समज धर काही अरे सख्या समज धर० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP