मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
ऐक सज्जना अरे मनमोहना ...

रामजोशी - ऐक सज्जना अरे मनमोहना ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


ऐक सज्जना अरे मनमोहना संपत पाहतां कवणाची ॥

जाईल काया जाईल माया उसणी आणिली पांचांची ॥ध्रु०॥

कौरव गेले पांडव गेले वदली वाणी व्यासांची ॥

छप्पन्न कोटी यादव गेले काया उरली कृष्णाची ॥१॥

रावण ज्ञानि तो अभिमानी खंडे केली वेदांची ॥

तेहतिस कोटी बंदि घातले घडि घडि त्याला१ तो जाची ॥२॥

सूर्यवंशी राम जन्मला केवळ माय भक्तांची ॥

हनुमंतानें अब्धि लंघिला नगरी जाळिली सोन्याची ॥३॥

चाप-पांणी बाण वर्षे२ कुडी पाहसी३ बा त्याची ॥

रावणाची शिरें मोकळीं काग हो त्याला टोंची ॥४॥

अठ्यायशीं हजार ऋषिवर४ वार्ता हो मार्कंडेयाची ॥

चौदा कल्पें उष्ण सोशिलें नाही छाया गुंफ़ेची ॥५॥

लोमहर्षणा लोम५ झडे तैं संख्या पुरे आयुष्याची ॥

ऐसे ऐसे होऊनि गेले काय कथा हो अणिकाची६ ॥६॥

कितीक येती कितीक जाती घिरटी होते काळाची ॥

ज्यांचे गांठी पुण्य नाही यम हो त्यांला बहु जाची ॥७॥

सावध व्हावें भजन करावें भक्ति करावी देवाची ॥

आतां तरी ही७ गोष्ट आयका नारायण श्रीरंगाची ॥८॥

॥ऐक सज्ज०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP