श्री कल्याण स्तवन - जगीं धन्य ते ब्रह्मपुरी म...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
जगीं धन्य ते ब्रह्मपुरी मसूरी । अधिष्ठान ते जाहले आसुरासी ।
असंख्यात सामर्थ्य या मारुतीचें । बहू चालिलें काम ईमारतीचें ॥१॥
महा माघ नौमीस आरंभ केला । प्रतिष्ठेसि तो लोक ऊदंड आला ।
महा थोर विद्वांस पंडीत थाटे । मिळे लोक संगीत वाद्ये अचाटे ॥२॥
बहू काम ते दाटि लोके अपारे । कुपा खाणिती गर्जती नाम थोरें ।
प्रतिष्ठा तये दिवसीं सर्व जालें । पुजेसे प्रसंगीं कुपीं तोय आलें ॥३॥
दुपारा खरें तीं मोहोछाव कामें । करीती असंभाव्य ते लोक नेमें ।
नव्हे कार्य कोणासि वेधावयासी । समर्थें सुखें नेमिलें निस्पृहासी ॥४॥
चढे थोर वृक्षावरी योगरासी । वरी नेमिलें कार्य कर्तव्य त्यासी ।
पडे देह अद्भूत तें कार्य होतां । समर्थांपुढें सांगती त्या वृतांता ॥५॥
समर्थीं बरें ऐकिलें वार्तिकाचें । पडे देह मुर्छीत त्या निस्पृहाचें ।
समर्थें मुखे बोलिजे त्यासि साचें । असे क्षेम तो नाम कल्याण त्याचें ॥६॥
प्रभूचे अशिर्वाद हे वाक्य आले । तैपासुनी सर्व आरोग्य जाले ।
नसे ते सिमा ग्रंथ हो लेखनाची । जगीं कीर्ति हे नाम कल्याण त्याची ॥७॥
महा तीव्र वैराग्य स्वामी समर्थें । सदा सेविलें थोर आरण्यपंर्थे ।
पुढें चालतां सिंधु कल्याण त्यासी । महा अंधकारें मिठी सावजासी ॥८॥
भयासूर त्या गर्जना सावजाची । पडे मेघ अद्भूत विद्युल्लतेची ।
प्रसंगी तये सांगती जेथ जेथें । सुखें जातसे सिंधु कल्याण तेथें ॥९॥
बहू पाणजंजाळ ते व्याळ वाटे । मनीं कार्य उद्दीत कांहीं न वाटे ।
चपेटे असे वर्ष काळीं च केले । वहू सर्प आंगावरूनी च गेले ॥१०॥
असो पर्वता स्वामि येणें जहालें । गडा सज्जना नृपतीं नाम ठेलें ।
मोहोछाव तो नित्य यात्रा जनाची । चहूं देशींचे लोक वित्पन्न त्यांची ॥११॥
कथा रम्य कल्याण नामें तयाची । निवे वृत्ति निवृत्ति त्या श्रोतयांची ।
कथा ऐकतां तो कृपापूर आला । समर्थें बहू श्रेष्ठ सन्मान दिल्हा ॥१२॥
असा सार्थकाचा बहू काळ गेला । समर्थीं पुढें पूर्ण अवतार केला ।
पूजा पादुकांची स्थळीं निश्चयासी । भजों लागले भक्त विज्ञानरासी ॥१३॥
भीमातीर गोदातीरा मध्यदेशीं । सीनेचे तीरीं राहिले योगवासी ।
तटाकीं च त्या नेटक्या रम्य गुंफा । जपा नेमिल्या योग कल्याणदीपा ॥१४॥
मुसांडि निघे झुंडि त्या निस्पृहाची । वयें द्वादशा षोडशा विंशताची ।
रुपें नेटके घेति कल्याणदीक्षा । सदा मागती पिष्ट ते मुष्टिभिक्षा ॥१५॥
सदा वाळवंटीं कथेचीं घमंडें । सुखें ऐकती धांवती मुंडमुंडे ।
यती भूपती येति अष्टा दिशांचे । स्वयें लोक ते सेवकातुल्य साचे ॥१६॥
बहूसाल संतर्पणें ब्राह्मणांचीं । प्रबोधून अध्यात्म ऊपासकाची ।
बहू लोक तो रंगला सज्ज साजे । जगीं रामऊपासनाघोष गाजे ॥१७॥
कल्यानस्वामींस नमून प्रेमें । ( अं )कीत ते चालती नित्य नेमें ।
( दे ) खोनि वैराग्य चक्कींत जाले । (ऐ) कोनिया लोक दुरूनि आले ॥१८॥
जनीं वाढलें बंड पाषांड होतें । सदा लालची सांगती ती नव्हे ते ।
उलंडून ती चंड थोतांड वाले । प्रतिष्ठून ते सत्य कल्याण केले ॥१९॥
अविनाश जें नाम कल्याण त्याचें । करी सर्व कल्याण सर्वां सिसांचें ।
समर्थें जना ऊतरायासि पारीं । असे ठेविली मूर्ति कल्याणकारी ॥२०॥
युगानुयुगें हरि अवतारी । + हे चि तो चंचळ वेषधारी ।
श्री(रा) मदासांकित बंधु जाला । अनंत तेथें नमनें मिळाला ॥२१॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP