मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें ३०४ ते ३०७

गोविंदकृत पदें ३०४ ते ३०७

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ३०४ वें.

धन्य दिवस सत्संगलाभ झाला । होता संशय तो मनांतील गेला ! ॥ध्रुवपद॥
दैवयोगें होतांचि संतभेटी । समाधान वाटलें माझे पोटीं ।
त्रिविधताप पळाले उठाउठी । कृपा करुनि दिधली दिव द्दष्टी ॥धन्य०॥१॥
कामधेनु कल्पवृक्ष चिंतामणी । उदारताही याची कोण मानी ।
संत कृपें दाविती चित्सुखखाणी । नेउनी बसविती साम्राज्यपदाच्या स्थानीं ॥धन्य०॥२॥
देशिकरायें अघटित ऐसें केलें । माझें मज स्वरूप दाखवीलें ।
आनंदाच्या सदनांत बैसवीलें । गोविंदाए मनोरथ पुरवीले ॥धन्य०॥३॥

पद ३०५ वें.

धन्य दिवस आज साधुसंग लाधला ।
अर्धोदय पर्वकाळ सर्व साधला ! ॥ध्रुवपद॥
फीरतां वनांत कल्पवृक्ष देखिला ।
खणतां महीत द्रव्यकुंभ लेखिला ।
लिहितां पिशाच लिप्त गुरु विलोकिला ।
तत्पदिं सप्रेमयुक्त भाळ ठेविला ॥धन्य०॥१॥
बुड्तां जळांत थोर नाव लाधली ।
तापतां उन्हांत आम्रवृक्षसाउली ।
तद्वत सत्संग गुरु माय पाहिली ! ॥धन्य०॥२॥
ठेवितांचि वरदहस्त मस्तकावरी ।
पाहिलें नरोत्तमास हृदयमंदिरीं ।
ना दिसेचि द्वैत एकला चराचरीं ।
भरला आनंद गोविंदाचे अंतरीं ॥धन्य०॥३॥

पद ३०६ वें.

देई राया ! सुत क्षितिचा वराया ! ॥ध्रुवपद॥
राम मनविश्राम सुरमुनिकामद प्रभुश्याम, घन तनु नाम जपत अराम, हर सुखधाम, पद निष्काम पद निष्काम रघुविर ॥देई०॥१॥
मित्रकुलपति पुत्र द्वय तव चित्र सम सुविचित्र: कर्तबगात्र कमनिय नेत्र अंबुजपत्र, नतचिन्मात्र, रघुविर ! ॥देई०॥२॥
कष्टला ऋषिश्रेष्ठ कौशिक तिष्ठला उत्तिष्ठ रघुपति, स्पष्ट देईं कनिष्ठ सुतसह नष्ट दुष्टवधार्थ रघुविर ! ॥देई०॥३॥
त्रास न करुनि भास, त्यजि विश्वास, धरि धर कास, गुरुचि त्यासि निरवुनि आस पुरवी दास नमि गोविंद रघुविर ॥देई०॥४॥

पद ३०७ वें.

रघुपति ऐक रामा ! । मुनिविश्रामधामा ! ॥ध्रुवपद॥
कूर निशिचर धूर,, धर रणशूर, वनिं मखचरू, करिती झुर, ती महिसूर, निज मनि पूरवी संकल्प  रघुपति ॥रघुपति०॥१॥
वार मय़ अनिवार करि शरमार रिपुगणहार, मुनिजन तार, भवभय
वार करिपद फार, मृदु अनिवार रघुपति ॥रघुपति०॥२॥
बंद हर सुरवृंद, सुखि कर द्वंदरहित आनंद, भोगवि मंद, मति गोविंद, तव गुण छंद गात प्रवंध रघुपति ॥रघुपति०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP