गोविंदकृत पदें २२७ ते २३०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २२७ वें
सुंदर ध्यान हरीचें । पाहतां नयनीं ।
मन उन्मन हें झालें स्वसुखेंकरुनी ! ॥ध्रुवपद.॥
माथां किरीट विराजितसे कुंडल श्रवणीं ।
कमलदलापरि साजे शोभा नयनीं ।
बाहुचतुष्टत आयुधें धरले पाणी ।
आभरणें तनु मंडित गळां मुक्तमणी ॥सुंदर०॥१॥
ह्रुदयीं श्रीवत्सनिकेतन दोहीं भागीं ।
चंदनलेप सुगंधित, श्यामला आंगीं ।
पीतांबर कटीं शोभे केशररंगी ।
वांकी पदीं, गर्जतसे असुरालागीं ॥सुंदर०॥२॥
कमला धरी ह्र्त्कमलावरी पदकमला ती ।
संवाणी सद्भावें बहु दिनराती ।
सनकादिक योगीन हृदयीं ध्याती ।
दास गोविंदाची सुखविश्रांति ॥सुंदर०॥३॥
पद २२८ वें.
बाई ! कधी पाहीन हा वनमाळी घेईन नव्हाळी ! ॥ध्रुवपद.॥
चिमण्या या गोपसमाजीं जेवी । दध्योदन सेवी ।
असल्या जन्मांतर सुकृतठेवी । तरि प्रीति करावी ।
त्यातें ठेवावें त्या हत्कमळीं ॥घेईन०॥१॥
ज्यातें कवटाळुनि गोपी धरिती । प्रेमें रंजविती ।
वृंदावनीं रासक्रीडा करिती । हरिसुख अनुभविती ।
छंदें बिंबोष्ठीं वाजवी मुरली ॥घेईन०॥२॥
ज्याच्या पदकमळीं पैंजण साजे । भुवनत्रयीं गाजे ।
ज्यातें स्तविती धर्मादिक राजे । गंभिरगिरा जे ।
तो हा भिवरोतिरीं भक्ताजवळीं ॥घेईन०॥३॥
सांगूं क्लेशांची कवणा वार्ता । गुरु नरहरिपरता ।
न दिसे त्रिभुवनीं मजलागुनि पाहतां । गोविंद दीनार्ता
सांगा हरिला शरणागत पाळीं ॥घेईन०॥४॥
पद २२९ वें.
श्रवण करा हरिकथा । कथा तुम्ही ! ॥ध्रुवपद.॥
पुराणपुरुष अच्युतगुण गातां । सेवा आराधनपथा पथा ॥श्रवण०॥१॥
भक्तिपुर:सर भागातातें । प्रेम करोनि मथा मथा ॥श्रवण०॥२॥
गोविंद म्हणे याविण स्वार्था । जन्म गेला वृथा वृथा ॥श्रवण०॥३॥
पद २३० वें.
कोठें क्रमिली रात्र एवढी प्राणवल्लभा ! हरी ! ।
खरं सांगा मज लवकरी ! ॥ध्रुवपद.॥
यदुकुलनलिनदिनेशा जी आश्वर्य एक गमतसे ।
बिंबाधर सुकले दिसे ॥
घुर्मित झाली दिष्टि कष्ट झाले वाटे भलतसें ।
घर्मे तनु भिजली असे ॥
चंदनलेप सुगंध अंगींचा मज कांहींना दिसे ।
लागले कोणाचें पिसें ॥
वज्रचुडयांचीं चिन्हें दिसती तुमच्या अंगावरी ॥खरं०॥१॥
तुम्ही तालेवार लोक तुम्हांला योग्य नव्हे गिरिधरा ! ।
प्राणसख्या रुक्मिणीवरा ! ॥
आज दिवस कीं माझा कळला असतां गुणगंभिरा ।
राजसा सौख्यसागरा ॥
मी लक्षित बसल्यें मार्ग केव्हांचा तुझा प्रियकरा ।
हा आर्षभाव कां बरा ॥
सेज बहुत अरुवार फुलांची रचिली जी मंदिरीं ॥खरं०॥२॥
हीन माझं प्रारब्ध बोल कोणाला ठेवूं तरी
हे रीत नव्हे कीं बरी ॥
काय मृषा प्रीतीच्या गोष्टी सांगतसां क्षणभरी ।
लक्षांश कोणावरी ॥
अष्टाधिक शतसोळासहस्र वनिता तुमच्या घरीं ।
अशी कोण मिळाली दरी ॥
तिजवरतीं हें लक्ष्य ठेइलें काय म्हणावें तरी ॥खरं०॥३॥
अति कनवाळू बाप दिनाचा प्रत्युत्तर दे तिला ।
कां भ्रंश तुला लागला ॥
भक्तासाठीं केलें धांवणें जीव माझा श्रांतला ।
म्हणऊनि घर्म अंगाला ॥
तीव्र उष्ण किरणें त्या रविचीं तेणें अधर सूकला ।
जागर बहु झाला मला ।
सर्वातरीं मी आत्मा असतां आळ घेसि मजवरी ॥खरं०॥४॥
ध्यान बहु सुंदर देवाचें पाहुनी भामा सती ।
आलिंगिला यदुपति ॥
प्रेमाश्रु हे स्रवति लोचनीं कुच तेणें भीजती ।
करी निंबलोण मागुती ॥
सप्रेमें गुरु नरहरिराया पूजिलें बहुतां रितीं ।
गोविंदाची सद्नती ॥
प्रकृतिपुरुष ऐक्याची गोडी काय म्हणावें तरी ॥खरं०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP