मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
नामदेवकृत पदें ४२ ते ४५

नामदेवकृत पदें ४२ ते ४५

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ४२ वें.

पहुडावें कान्हा ! कमलदललोचना । शयनीं शयन करावें जी ! ॥ध्रुवपद.॥
जाइ जुइ सेवती मोगरा मालती । कोमाइल्या पुष्पयति जी ! ॥पहु०॥१॥
सहस्त्रफणी तिष्ठत उभा । देहा रचुनियां जी ! ॥पहु०॥२॥
इंद्रादिक देव  तिष्ठत उभे । आज्ञा द्यावी जायाशी ॥पहु०॥३॥
रुक्मिणीसहित करावी निद्रा । नयन कोमावले जी ! ॥पहु०॥४॥
देव आले निजमंदिराशीं । आज्ञा द्यावी नामयाशी ॥पहु०॥५॥

पद ४३ वें.

येईं हो ! विठ्ठले ! माझे माउलिये ! ।
निढळावरि कर ठेवुनि वाट मी पाहें. ॥ध्रुवपद.॥
आलीया गेलीया हातीं धाडीं नीरोप ।
पंढरपुरीं आहे आइबाप. ॥येईं०॥१॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनिं झळकला ।
गरुडावरि बैसोनी कैवारी आला. ॥येईं०॥२॥

पद ४४ वें.

पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारा ।
पतितपावन न होसी म्हणुनि जातों माघारा. ॥ध्रुवपद.॥
सोडीं देवा ! ब्रीद आतां न होसी अभिमानी ।
पतितपावन नाम तुजला ठेवियलें कोणी ? ॥पतित०॥१॥
घेसी तेव्हां देसी ऐसा अससी उदार ।
काय देवा ! रोधूं तुमचें कृपणाचें द्वार ? ॥पतित०॥२॥
उच्छिष्ठाचे सीत देवा न टाकिसी बाहेरी ।
कोणी दिधली भगवंत तुजला भूषणाची थोरी ? ॥पतित०॥३॥
नामा म्हणे बा ! तुमचें नलगे मज कांही ।
प्रेम असों द्या, हृदयी तुमचे आठवीन पायीं. ॥पतित०॥४॥

पद ४५ वें.

गोविदा ! रामा ! नरहरी ! ॥ध्रुवपद.॥
बाबा ! अहंकार निशि घनदाट । गुरुवचनासी फुटली फांट ।
माता भक्तीचे भेट्ली वरवंट । तिनें मार्ग दाखविले चहुंकडे ॥गो०॥१॥
एक शब्द स्पष्ट बोलावा । वाचे ‘हरी हरी’ म्हणावा ।
संतसमागम धरावा । तेणें ब्रम्हानंद होय आघवा. ॥गो०॥२॥
आला शीतळ शांतीचा वारा । तेणें ब्रम्हानंद होय आघवा. ॥गो०॥३॥
अनुहात वाजवा टाळ । अनुक्षिर गीत रसाळ ।
अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा. ॥गो०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP