गोविंदकृत पदें ३११ ते ३१३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ३११ वें.
दशमुखदर्पभंजना रामरंजना मरुततनया ! ॥ध्रुवपद॥
रघुनाथ प्रियकरा हरी, तारि भवपुरीं मज कपिराया ।
मुखिं नासिकिं भरलें नीर काढीं सत्वर धरुनि बाम्हा ।
आशा सुसरी जलचरी ओढी बळकटें धरुनी पाया ।
न दिसे मज तारु तरी धांव सत्वरी प्राणसखया ॥दशमुख०॥१॥
हा काम व्याळ अतिविशाळ डंखित काळ मला वाटे ।
येतसे लहर विषयाची मोहें कंठ असें दाटे ।
न सुचे मज कांहीं यत्न कर्म पूर्वीचें बहु खोटें ।
होतसे विकल बहु गात्र मांत्रिका ये धांवुनि सदया ॥दशमुख०॥२॥
श्रीरामभक्त संकटीं घालिती मिठी बा तव पायीं ।
पुर्वापरता रक्षिलें बहुत शिक्षिले दुर्जन पाहीं ।
माझा कां आला वीट देई मज भेट तूं लवलाहीं ।
गोविंदास उद्धरी कृपा करीं मज नरहरिराया ॥दशमुख०॥३॥
पद ३१२ वें.
आलारे आलारे मारुती आलारे ! ॥ध्रुवपद॥
थर थर थर कांपती धराधरा । गर गर ग्र नक्षत्रें महिवर ।
पड्ती, उडती दिग्गज प्रलयो झालारे ॥मारुती०॥१॥
देव विमाने सांडुनि पळती । चवदा भुवनें तेजें जळती ।
हत्ती टाकुनि सुरपती पळुनि गेलारे ॥मारुती०॥२॥
सागर सीमा सांडुं पाहे । अपर्णा धरी सांबाचे पाये ।
गोविंद भ्रमर कपिपदकमळीं दडला रे ॥मारुती०॥३॥
पद ३१३ वें.
कैंचा वानर आला न कळे म्यां कैसा तरि गिळीला गे ! ।
ज्याच्या मुक्तिच मजला नाहीं कोण समजला गे ! ॥ध्रुवपद॥
तापत्रय संसारापासुनि मुक्त करिल हें गमतें गे ! ।
मी भोळी मज काय कळे हें आतां मानस भ्रमलें गे ! ॥कैंचा०॥१॥
गोविंद म्हणे क्षणभरि तूं धीर घरीं भोग देहाचा सरला गे ! ।
श्रीसद्रुरु महाराज नरहरि वाहयांतरि तो भरला गे ! ॥कैचा०॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP